वर्धा : मानवाच्या अनाथ मुलांप्रमाणेच प्राण्यांचीपण अनाथ पिल्ले असू शकतात. त्याची कारणे अनेक. मात्र या अनाथ पिल्लांना ममता देत त्यांचा सांभाळ करण्याचे जिकिरीचे कार्य येथील करुणाश्रम या संस्थेत चालते. याच संस्थेत सध्या पुष्पा व छाया या अस्वल पिल्लांची जोडी धूम करीत आहे.
पुष्पा हे पिल्लू कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी येथे एक महिन्याच्या अवस्थेत आढळून आले होते. वन खात्याने ते या आश्रमाच्या हवाली केले. सापडले त्या दिवशी पुष्पा चित्रपट रिलीज झाला होता. म्हणून मादी पिल्लाचे तसे नामकरण झाल्याचे आश्रम संचालक आशिष गोस्वामी सांगतात. तर छाया ही तीन महिन्यांची असताना टीपेश्वर जंगल शेजारी शेतात तारात अडकून पडल्याच्या स्थितीत सापडली. तिला आश्रमात आणण्यात आले. दोन्ही पिल्लांचा प्रारंभी बॉटलने दूध पाजून सांभाळ करण्यात आला. आता दोन्ही तेरा महिन्यांच्या आसपास झाल्या आहेत. त्यामुळे खाण्याची चंगळ आहे.
हेही वाचा – सिंधूताईंच्या माहेरच्या वारकऱ्यांना कर्मभूमी पुण्यात पुरणपोळीचा पाहुणचार
मस्त फलाहार झोडत असल्याचे सांगण्यात आले. दोघींसाठी मोठा निवारा बांधण्यात आला आहे. लोकसत्ता सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून जमा देणगी विविध सेवाभावी संस्थेस प्रदान करते. ती मदत या करुणाश्रमलापण लाभली. त्याच निधीतून या जोडीसाठी निवारा बांधण्यात आल्याची माहिती गोस्वामी यांनी दिली.