नितीन पखाले, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ फेब्रुवारीला यवतमाळमध्ये सभा झाली. या कार्यक्रमापूर्वी कोणत्याही निविदा न बोलावता, कार्यारंभ आदेश न काढता तब्बल २० कोटी ५५ लाख रुपयांची कामे करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, सभेनंतर १५ दिवसांनी या कामांसाठी ई-निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’ने १ मार्चच्या अंकात ‘मोदींच्या कार्यक्रमासाठी तेरा कोटींचा सभामंडप’ या मथळयाने वृत्त प्रकाशित केले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने  या कामाची निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.व्ही. मुकडे यांनी १४ मार्च रोजी या निविदा काढल्याची स्वाक्षरी असल्याच्या आदेशाची प्रत ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहे.

या निविदा सूचनेत बी-१ नमून्यात ऑनलाईन ई-निविदा मागवल्या आहेत. १४ ते २० कंत्राटदार महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे योग्य वर्गात नोंदणीकृत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तब्बल २६ एकरांवर सभा मंडप, काय आहे वैशिष्ट्ये जाणून घ्या

यवतमाळनजीक डोरली येथे ४७ एकर जागेवर मोदींच्या सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या सभास्थळाचे सपाटीकरण, मंडप उभारणी, खडीकरण, डांबरीकरण आदी सर्व नऊ कामांची एकत्रित निविदा रक्कम  २० कोटी ५५ लाख १९ हजार रुपये इतकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम तीन विविध एन्जसींना यापूर्वीच दिले होते. या एन्जसी अनुक्रमे जळगाव, अकोला व नागपूर येथील होत्या. या एजंसींनी ही कामे स्थानिक पातळीवर करून घेतली.

कार्यक्रमानंतर १५ दिवसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांसाठी निविदा सूचना प्रसिद्ध केल्याने, प्रशासनाने कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय केवळ आठ दिवसांत विशेष बाब म्हणून या कामास मान्यता दिली होती, हे स्पष्ट झाले.  निविदा न काढता कामे कंत्राटदारांना देण्यात आल्याने शासनाच्या ई-निविदा प्रक्रियेच्या निकोप स्पर्धेला प्रशासनानेच हरताळ फासल्याचा आरोप होत आहे.

‘आठ दिवसांपूर्वी शक्य नव्हते’

पंतप्रधानांच्या सभेपूर्वी केवळ आठ दिवसात निविदा सूचना प्रसिद्ध करून कामे करणे शक्यच नव्हते. त्यामुळे आता निविदा सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सभेची कामे आधीच झाली असली तरी अद्याप या कामांचा निधी मिळालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकडे यांनी दिली. त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pwd allotted works over rs 20 crores for pm narendra modi rally without inviting any tender zws
Show comments