नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान राज्यातील मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहेत. नितेश राणे यांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांनी मुस्लीम समजाबद्दल दृष्टीकोन बदलावे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्त्वावर काम करत आहेत. अशावेळी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करून नये, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत माधव नेत्रालयाच्या नव्या विस्तारित इस्पितळाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होऊ घातले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणिराष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मार्चला नागपूर दौरा होतो आहे. मोदी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते सकाळी १० वाजता नागपूरमध्ये दाखल होणार असून ११.३० पर्यंत शहरात येणार आहेत. पंतप्रधानांची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असली तरी त्यानिमित्ताने लागणारा बंदोबस्त, शहरातील संवेदनशील भागातील हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक पोलिसांवरच आहे. नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी चौखपणे पार पाडण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम हा तसा शहराबाहेर (हिंगणा) आहे. हिंसाचारग्रस्त भाग आणि कार्यक्रमस्थळ याच्यात मोठे अंतर आहे. पण सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांना सजग रहावे लागणार आहे.
या कार्यक्रममाला राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. दंगलीनंतर होत असलेला हा कार्यक्रम सुरक्षितपणेपार पाडावा म्हणून पोलीस यंत्रणा मेहनत घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मुस्लीम समजाबद्दल पुन्हा वक्तव्य केले आहे. त्यानंतर प्यारेखान यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी नितेश राणे यांनी सबुरीचा आणि जबाबदारीने वागण्याचा, बोलण्याचा सल्ला दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नितेश राणे यांची तक्रार करणार असल्याचे सांगितले.
नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बुरख्याबद्दल वक्तव्य केले आहे. राणे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्यारे खान यांनी म्हटले आहे.