अकोला : साप हा शब्द जरी कानावर पडला तर अंगावर भीतीने काटा येतो. अवाढव्य अजगर अचानक समोर आला तर काय? अशीच खळबळजनक घटना अकोला शहरात घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात सहा फूट लांबीचा मोठा अजगर आढळून आला. सर्पमित्र बाळ काळणे यांनी त्याला पकडले असता अजगर जखमी असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय रुग्णालयात अजगरावर उपचार करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाजवळ अजगर आढळून आला. भला मोठा अजगर सरपटत असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे व वनपाल गजानन इंगळे यांच्या निर्देशानुसार सर्पमित्र बाळ काळणे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी अजगराला पकडले. अजगराला गंभीर जखमा असल्याने बाळ काळणे यांनी त्याला काळजीपूर्वक पोत्यात टाकून शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. त्याठिकाणी डॉ. पी. एन. राठोड, डॉ. प्रदीप गावंडे, डॉ. वर्षा चोपडे व रुपेश बोराळे यांनी जखमी अजगरावर उपचार केले. उपचारानंतर अजगर सुरक्षित असल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले. जीएमसीतील कर्मचारी, वन विभाग व सर्पमित्र बाळ काळणे यांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवनदान मिळाले.