नागपूर : कोराडीत प्रस्तावित वीज प्रकल्पाच्या जनसुनावणीत काँग्रेस-भाजपा समर्थक समोरासमोर आल्यावर गोंधळ उडाला. सुनावणीत कुणीही विरोधात मत मांडताच उपस्थित जमाव दबावतंत्राचा वापर करत होता. त्यामुळे प्रकल्पाला समर्थन दर्शवणारे खरच स्थानिक नागरिक होते की भाजपा कार्यकर्ते होते, हा प्रश्न आता चर्चिला जात होता.

महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पात ६६० मेगावॅटचे २ संच प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेत सोमवारी जनसुनावणी झाली. उपस्थितांमध्ये भाजपा कार्यकर्ते, भाजपा समर्थक कंत्राटदार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने आधीपासूनच प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. दरम्यान, काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि राज्य व शहर कार्यकारिणीचे सदस्य जनसुवाणीला हजर होते. यावेळी काँग्रेसने प्रकल्पाला कडाडून विरोध केला. काँग्रेस नेते विशाल मुत्तेमवार, संदेश सिंघलकर हे प्रकल्पाच्या विरोधात मुद्दे मांडत असतानाच गर्दीतून प्रकल्पाच्या समर्थनार्थ नारे दिले जात होते.

हेही वाचा – नागपूर: चित्त्यांचा मृत्यू भारतात, कारणांचा अभ्यास आफ्रिकेत!

प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जात होता. त्यामुळे काँग्रेस नेते मंडपातून बाहेर पडले. त्याचवेळी स्थानिक प्रकल्प समर्थक असल्याचे दर्शवणाऱ्यांशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काँग्रेस मुर्दाबादचे नारे देण्यात आले. त्याला काँग्रेसनेही प्रत्युत्तर देत खोके सरकार मुर्दाबाद असे नारे दिले. काँग्रेस विरोधात नारे देणाऱ्यांत भाजपा समर्थित कंत्राटदार, कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काहींनी सांगितले. सुनावणीतून काँग्रेस पदाधिकारी बाहेर गेल्यावरही हा गाेंधळ सुरूच होता. पर्यावरणवादी आपली भूमिका मांडत असतानाही गर्दीतून प्रकल्पाला समर्थन असल्याचे भासवले जात होते. त्यातच काही स्वयंसेवी संस्थांनी राखेमुळे होणाऱ्या त्रासाबाबत इन कॅमेरा प्रतिक्रिया देणाऱ्या नागरिकांची नावे घेतली. अचानक त्यांनी भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले.

‘एनटीपीसी’ला बावनकुळेंचा विरोध होता

मौदा तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पामध्ये २०१० मध्ये १,३२० मेगावॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी आयोजित जनसुनावणीत विद्यमान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार ॲड. आशीष जयस्वाल यांनी प्रकल्पाला विरोध करत गोंधळ घातला होता. त्यामुळे जनसुनावणी रद्द करण्यात आली, याकडे पर्यावरणवाद्यांनी लक्ष वेधत आता बावनकुळे कोराडी प्रकल्पाला समर्थन देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ प्रशासन विद्यार्थीकेंद्रित असणे गरजेचे! आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत

“वीज प्रकल्प असो अथवा इतर कोणत्याही जनसुनावणीत कार्यकर्त्यांची गर्दी जमवून नाटक करण्याचे काम काँग्रेसकडूनच केले जाते. भाजपा अशा कृत्यात कधीच सहभागी होत नाही. कोराडीतील जनसुनावणीत सहभागी स्थानिक नागरिकांना भाजपा कार्यकर्ते म्हणणे योग्य नाही.” – चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप.