गोंदिया : सारस पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गोंदिया परिसरात वावर असलेल्या दोन सारस पक्ष्यांना दोन महिन्यापूर्वी जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर लावले होते. यापैकी एका सारस पक्ष्याचा ११ केव्ही विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवार २६ मार्च रोजी सकाळी गोंदिया तालुक्यातील माकडी परिसरात घडली. त्यामुळे सारस पक्ष्यांच्या संवर्धन व उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आहे; पण सारस संवर्धनाकडे होत असलेल्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सन २००८ मध्ये ५२ असलेली व्यस्क सारस पक्ष्यांची संख्या २६ वर आली आहे . तर एकूण १२ निम्न व्यस्क सारस पैकी एकाचा बुधवारी मृत्यू झाल्याने त्यांची संख्या आता ११ झाली आहे. सारस संवर्धनासाठी शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती. तसेच शासन आणि प्रशासनाला सारस संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले; पण यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सारस पक्ष्यांचे अस्तित्व कायम रहावे, त्यांची संख्या कशी वाढविता येईल, त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार यासाठीच दोन सारस पक्षांना दोन महिन्यापूर्वी टॅगिंग केले होते पण यापैकी एका सारस पक्षाच्या विद्युत धक्का लागून बुधवारी मृत्यू झाला असल्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या अभ्यासावरही पाणी फिरले गेले आहे.

उपाययोजनांची गरज

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बुधवारी घडलेली घटना अतिशय दुःखद असून यानंतर अशा घटना घडू नये यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शासन आणि प्रशासनाने सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी अभ्यास निश्चित करावा पण त्या आधी सारस पक्ष्यांचे अस्तित्व कसे कायम राहील यासाठी उपाययोजना ही कराव्यात, अन्यथा सारस पक्षी भविष्यात चित्रातच पाहायला मिळतील.- सावन बहेकर,मानद वन्यजीव सदस्य, अध्यक्ष सेवा संस्था,गोंदिया

विद्युत तारा कोटेड करण्यासाठी निधी मिळेना गोंदिया तालुक्यासह परिसरात सारस पक्ष्यांचा अधिवास आहे. त्यामुळे सारस पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी या परिसरातील विद्युत तारा कोटेड करण्यासाठी ४८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी महावितरण कडून करण्यात आली होती; पण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी बुधवारी विद्युत तारांचा स्पर्श होऊन सारस पक्ष्यांच्या मृत्यू झाला आहे.-दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्राधिकारी , गोंदिया