नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिसऱ्या दिवशी केदार यांची आमदारची रद्द केली होती. आता हीच तत्परता नार्वेकर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात दाखवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा झाली होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर लगेचच राज्य सरकारच्या वतीने राजपत्र काढण्यात आले आणि सुनील केदार यांची आमदारची रद्द करण्यात आली. आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी कोणत्याही न्यायालयाने शिक्षा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द केले जाते.
त्या कायद्याच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील सावनेर या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली. त्यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जास्तकाळाची शिक्षा सुनावली गेली. तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. त्याच नुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली. आता कोकाटे यांना तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये, अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे.
माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. १९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज या प्रकरणात निर्णय सुनावला आहे.
फेरफार व फसवणुकीचा आरोप
तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणार्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात दावा दाखल केला होता. यात माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ बंधु सुनील कोकाटे हे आरोपी नंबर १ व २ होते आणि ३ व ४ क्रमांकाचे आरोपी हे कोकाटे यांचे नातेवाईक होते. त्यांनी मिळवलेल्या सदनिका नंतर कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतल्या. कोकाटे यांनी सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्बल घटकातून येत असल्याचे दाखवले होते.