जी-२० शिखर परिषदेसाठी एकीकडे शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे नागपूरकरांची गैरसोय होत आहे. वर्धा मार्गावरील अजनी चौकात सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे येथे दिवसभर असह्य वाहनकोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, रुग्णवाहिकांना आणि चाकरमान्यांना बसत आहे.
हेही वाचा >>>नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक
विशेष म्हणजे, रस्ता अरुंद असतानाही रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहनांना जायला रस्ताच उरत नाही. वाहतूक नियंत्रणासाठी येथे सुरक्षा रक्षक किंवा पोलीस राहात नसल्याने समस्या अधिक वाढली आहे.अजनी चौक ते उड्डाणपुलापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. त्यासाठी निम्मा रस्ता खोदण्यात आला आहे. उर्वरित रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. मोठे खड्डे पडले आहेत. अशाच स्थितीत सध्या येथून सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. हा अतिशय वर्दळीचा हा रस्ता असून नागपूरमधून वर्धा, चंद्रपूरकडे जाणारी सर्व प्रवासी वाहने, जड वाहने आणि इतर खासगी वाहने येथून जातात. या रस्त्याला दक्षिण नागपूरला जोडणारा रस्ता येऊन मिळतो. त्यामुळे येथे सकाळपासूनच प्रचंड वाहनकोंडी होत आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. वर्धा मार्गावर राहणारे विद्यार्थी दक्षिण नागपूरमधील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात. त्यांना तेथून वाहने काढताना त्रास होतो. रस्त्यालगत असलेल्या दुकानांची वाहने अरुंद रस्त्यावरच उभी केली जातात. त्यातल्या त्यात हल्दिराम उपाहारगृहात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने वाहनकोंडीत भरच पडते. तेथून वाहनेच काढता येत नाहीत. कंत्राटदाराने येथे सुरक्षा रक्षकही ठेवला नाही. एखादे वाहन बंद पडले तर काही क्षणात शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मेडिकलमधून आलेल्या रुग्णवाहिकेला एम्स किंवा अन्य मार्गावरील रुग्णालयात जायचे असेल तर त्याही खोळंबतात. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
जी-२० परिषद तोंडावर, कामे अपूर्णच
जी-२० साठी रस्ते व शहर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र परिषदेची तारीख पाच दिवसांवर आली तरी अद्याप अजनी चौकातील रस्त्याचे काम अपूर्णच असून ते इतक्यात पूर्ण होण्याची शक्यता नाही. हॉटेल प्राईडपुढेही सध्या रस्त्याचे काम सुरूच आहे.