नागपूर : महाराष्ट्रातल्या ‘वॉकर’ या वाघाने अवघ्या वर्षभरात तब्बल तीन हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला. त्या वाघाला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’मुळेच त्याची ही भ्रमंती जगासमोर आली. या वाघाने भ्रमंतीदरम्यान दोन राज्येही पालथी घातली. आता महाराष्ट्रातल्या कासवाबाबतही हाच इतिहास रचला जात आहे.
कोकणच्या किनाऱ्यावर उपग्रह ट्रान्समीटर बसवलेले ऑलिव्ह रिडले कासव आता बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या कासवाला ‘बागेश्री’ असे नाव देण्यात आले असून सात महिन्यात तिने तब्बल पाच हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या या मादी कासवाला समुद्रातील तिच्या प्रवासाचा शोध घेण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये उपग्रह ट्रान्समीटर लावण्यात आले. यानंतर तिला समुद्रात सोडण्यात आले आणि तिने अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ ते अगदी कन्याकुमारीच्या किनाऱ्यालगत प्रवास केला आणि मग जुलै महिन्यात ती श्रीलंकेला जाऊन पोहोचली. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत हिंदी महासागरात ती बरेच दिवस होती आणि मग तिने बंगालच्या उपसागराचा मार्ग घेतला. ‘बागेश्री’ आता पुन्हा बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेकडे वळली आहे.
हेही वाचा – वर्धा : आता गावागावात भाजपा नेत्यांसाठी पत्रकारांतर्फे चहापान व एकदा जेवण
हेही वाचा – आता रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३ हजार ६५२ कॅमेऱ्यांची नजर
‘बागेश्री’सारख्या सात ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. असा प्रयोग भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पहिल्यांदाच करण्यात आला आणि महाराष्ट्राची ही कासव संवर्धनाची चळवळ जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली. राज्याचा कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्था डेहरादून यांनी एकत्रितपणे हा प्रकल्प हाती घेतला आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रजननासाठी येणाऱ्या ऑलिव रिडले कासवांचा अभ्यास करण्यासाठी दोन टप्प्यांत कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे या कासवांचे सिग्नल एकेक करत बंद झाले. दुसऱ्या टप्प्यात मात्र या प्रयोगाला यश आले. ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ या दोन्ही मादी कासवांकडून त्यांच्या समुद्रातल्या प्रवासाचे सिग्नल उत्तम प्रकारे मिळत आहेत. ‘बागेश्री’ने श्रीलंकेपर्यंतचा पल्ला गाठला आहे तर ‘गुहा’ कर्नाटकच्या किनाऱ्यालगत फिरते आहे.