गोंदिया: खरिपाकडून अपेक्षा असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांना फटका बसला. मात्र नाउमेद न होता शेतकऱ्याने परत एकदा कंबर कसली. रब्बी पिकांसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. यंदा तब्बल १.२६ लाख हेक्टरमध्ये रब्बी पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यात यंदा हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली असली तरी सर्वाधिक धान पिकाचे क्षेत्र नियोजित केले आहे. तर इतर कडधान्याचा पेरा घटला असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार गोंदिया जिल्ह्यात यावर्षी रब्बी धान पिकाचे ८० हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले असून मागील वर्षीच्या रब्बी हंगामात ४३११२.६८ हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यात गहू यंदा ३ हजार हेक्टरवर नियोजीत आहे. तर गेल्या वर्षी २२३२.०७ हेक्टरवर गहू पिक घेण्यात आले होते.
हेही वाचा… राज्यातील विविध पक्षीय युवा आमदारांना वेल्स विद्यापीठाचे निमंत्रण
तर हरभरा पिकाच्या लागवडीचे नियोजन ९४९६.८३ हेक्टरवर करण्यात आले असता ८०५२.१५ हेक्टवर मागील वर्षी हे पीक घेण्यात आले होते, यंदा ज्वारी ५०० हेक्टर, मका ७ हजार हेक्टर, करडई १८९७ हेक्टर, सूर्यफूल ४.२८ हेक्टर, जवस ६५०० हेक्टर, तर इतर रब्बी पिके १२ हजार २५६ हेक्टर क्षेत्रात नियोजित करण्यात आली आहे.
रबी हंगामात
पीक | अपेक्षित क्षेत्र |
रब्बीज्वारी | ५०० हेक्टर |
गहू | ३००० हेक्टर |
मका | ७००० हेक्टर |
हरभरा | ९४९७ हेक्टर |
लाखोरी | ७००० हेक्टर |
उन्हाळीधान | ८०,००० हेक्टर |
दरवर्षी कृषी विभागाकडून खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात नियोजन तयार करण्यात येत असतात दरवर्षी त्यात वाढ करण्यात येते. तर त्या आधारावर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत असते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाच्या काळजीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असते. – हिंदूराव चौव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया