नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अमृत महोत्सवादरम्यान विद्यार्थिनींच्या झालेल्या रॅगिंग प्रकरणाची वैद्यकीय सचिव दिनेश वाघमारे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मेडिकल प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची माहिती देण्याची सूचना केली आहे.

वैद्यकीय सचिव कार्यालयाने मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयाला मंगळवारी तातडीने या प्रकरणाची सर्व माहिती सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार मेडिकलकडून प्रक्रिया केली जात आहे. अँटी रॅगिंग समितीकडून संबंधितांना तसा अहवालही पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय सचिवांनी दखल घेतल्यावर आता या प्रकरणात मेडिकल प्रसासन पुढे काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर मेडिकलच्या अँटी रॅगिंग समितीचे सदस्य आणि मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा – वर्षभरात ११४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील विदारक चित्र

घटना काय ?

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अमृत महोत्सवात एकीकडे संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम होत होते, तर दुसरीकडे येथील विद्यार्थिनींची ‘रॅगिंग’ झाल्याची निनावी तक्रार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मिळाली आहे. आरोग्य विद्यापीठ, नाशिककडे गेलेल्या तक्रारीवर विद्यार्थिंनींचे पालक व वसतिगृह क्रमांक २ मध्ये सातत्याने रॅगिंग होत असल्याचे नमूद आहे. विद्यापीठाकडे ही तक्रार १८ डिसेंबरच्या दरम्यान करण्यात आली. विद्यापीठाने ही तक्रार १ जानेवारीला मेडिकल प्रशासनाकडे वर्ग केली. त्यावर मेडिकल प्रशासनाने तातडीने हे प्रकरण समितीकडे सोपवले. समितीने बैठक घेत येथील विद्यार्थिनींना बोलावून विचारणा केली. पुढे येऊन तक्रार करा, संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासनही दिले गेले. कारवाई करताना आपले नाव गुप्त ठेवण्याबाबतही सांगण्यात आले. परंतु कुणीही पुढे आले नाही. उलट सगळ्या विद्यार्थिनींनी रॅगिंग झाले नसल्याचे लेखी दिले. त्यावरून प्राथमिक अहवाल करून समितीकडून विद्यापीठासह समितीच्या संबंधित विभागालाही माहिती दिली गेली.

हेही वाचा – महायुती आणि इंडिया आघाडीत उमेदवारीवरून पेच

मेडिकलमध्ये बऱ्याच तक्रार..

मेडिकल रुग्णालयात गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील स्नानगृहात महिला डॉक्टरच्या व्हिडीओचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर लैंगिक शोषणाबाबतची एक तक्रार अधिष्ठात्यांकडे आली. त्यात मानसोपचार विभागाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने तेथील विशिष्ट वरिष्ठ डॉक्टर विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार केली. याप्रकरणात अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी ४ सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीने अधिष्ठातांना अहवालही सादर केला. त्यात काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा मेडिकल प्रशासनाचा दावा आहे.

Story img Loader