नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अमृत महोत्सवात एकीकडे संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम होत होते, तर दुसरीकडे येथील विद्यार्थिनींची ‘रॅगिंग’ झाल्याची निनावी तक्रार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मिळाली आहे. परंतु ‘रॅगिंग’ विरोधी समितीकडे कुणीही ‘रॅगिंग’ झाल्याचे कबूल केले नाही.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडे गेलेल्या निनावी तक्रारीवर विद्यार्थिंनींचे पालक व वसतिगृह क्रमांक २ मध्ये सातत्याने रॅगिंग होत असल्याचे नमूद आहे. विद्यापीठाकडे ही तक्रार १८ डिसेंबरच्या दरम्यान करण्यात आली. विद्यापीठाने ही तक्रार १ जानेवारीला मेडिकल प्रशासनाकडे वर्ग केली. त्यावर मेडिकल प्रशासनाने तातडीने हे प्रकरण समितीकडे सोपवले. समितीने बैठक घेत येथील विद्यार्थिनींना बोलावून विचारणा केली. पुढे येऊन तक्रार करा, संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासनही दिले गेले. कारवाई करताना आपले नाव गुप्त ठेवण्याबाबतही सांगण्यात आले. परंतु कुणीही पुढे आले नाही. उलट सगळ्या विद्यार्थिनींनी रॅगिंग झाले नसल्याचे लेखी दिले. त्यावरून प्राथमिक अहवाल करून समितीकडून विद्यापीठासह समितीच्या संबंधित विभागालाही माहिती दिली गेली.
हेही वाचा – कुटुंबातील उमेदवारांना समान गुण! तलाठी भरती प्रकरण; सरकार तपास करत नसल्याचा आरोप
हेही वाचा – नागपूर : ३४ बालके गर्भातच दगावली! १८ नवजातांचा महिनाभरात मृत्यू
अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
या विषयावर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. काहींनी प्रतिसाद दिला नाही. एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर रॅगिंगची तक्रार आली, परंतु असले काहीही घडले नसल्याचे विद्यार्थिनींनी लेखी दिल्याचा दावा केला.