नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यात नागपूरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. राहूल आत्राम या नागपूरच्या उमेदवाराने दुसऱ्यांदा यूपीएससीमध्ये यश मिळवले. आयपीएस झालाे तरी आयएएस झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा संकल्प राहूलने केला होता.
आज त्याच्या आणि परिवाराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच दोन वर्षे जोमाने अभ्यास करून नागपूरच्या राहूल रमेश आत्राम याने २०२३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात ६६३ वा रँक घेत यश मिळवले. त्याला आयपीएस पद मिळण्याची शक्यता होती. ते पूर्णही झाले.
सध्या राहूल आत्राम परीविक्षाधिन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाला असला तरी राहूल आत्राम यांनी आयएएस मिळवण्याची खूनगाठ बांधली होती. त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि २०२५ मध्ये त्याचे स्वप्न पूर्णही झाले आहे. राहूल आत्राम याला २०२५ मध्ये ४८१ रँक मिळाली आहे. यशस्वी होण्याची खूनगाठ बांधली तर यश नक्की मिळतो हे राहुलने दाखवून दिले. पदवीचे शिक्षण घेत असतानाही राहूनने दिल्ली गाठायची ती केवळ मुलाखतीसाठी असा संकल्प केला होता. त्यावेळी त्याने तो पूर्ण करून दाखवला.
वडील रमेश आत्राम समाज कल्याणमध्ये अधिकारी असल्याने लहानपणापासून लोकांच्या समस्या जवळून पाहता आल्या. शिवाय मुळ गाव गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने तेथील स्थानिक समस्यांना जवळून अनुभवता आले. त्यामुळे अशा शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी काम करायचे असे ठरवून यूपीएससीकडे वळल्याचे राहुल सांगतो. यातून आयएएस मिळाल्यावर अधिक जोमाने काम करता येईल असा संकल्प त्याने केला आहे. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्य हेच खरे यशाचे गमक असल्याचे राहूल म्हणाला. दुसऱ्यांदा यूपीएससी उत्तीर्ण झाल्यावर राहूल आत्राम यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.