नागपूर : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला केला. जातीय जनगणना, आरक्षणाची मर्यादा आणि संविधानाचे रक्षण आदी मुद्दयांवरून त्यांनी संघ आणि भाजपसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. मी जातीय जनगणनेची गोष्ट सुरू केल्यापासून नरेंद्र मोदींची झोप उड्याल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.

१० टक्के लोकांच्या हातात सर्व अधिकार

या देशातील ९० टक्के लोकांजवळ जर देशातील संपत्ती नसेल तर त्यांच्या जगण्याला अर्थ काय. अलिकडे ‘आदर’ हा शब्द खूप वापरला जातो. परंतु, तुमच्याकडे शक्ती, संपत्ती नसेल तर तुमचा आदर कोण करणार?, कुणी २४ तास उपाशी आहे आणि मी त्याला तुझा खूप आदर करतो असे सांगून फायदा काय? असा प्रश्नही राहुल गांधींनी केला. त्याला शक्ती द्या, संपत्ती द्या, मग तुम्ही त्याचा आदर करावा याची गरजही पडणार नाही. त्यामुळे आज आमच्यासमोर आज सर्वात मोठा प्रश्न ९० टक्के लोकांचा आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. नुकताच रायबरेलीला गेलो असताना अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान नाव विचारले तेव्हा एकही अधिकारी एससी, एस.टी. ओबीसी, अल्पसंख्यांक नव्हता. हीच या देशातील खेदाची गोष्ट असल्याचेही गांधी म्हणाले.

हेही वाचा…चंद्रपूर : बंडखोर पाझारे, अली, वारजूकर, गायकवाड यांची भाजपातून हकालपट्टी

शेतकऱ्यांने कर्ज बुडवले तर कारागृहात टाकता आणि अदानीला…

कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना मदत म्हणजे ९० टक्क्यांची गोष्ट केली तेव्हा आम्ही त्यांच्या सवयी खराब करतो असा आरोप होतो. शेतकऱ्यांनी कर्ज परत केले नाही तर त्याला कारागृहात डांबले जाते. अदानींनी जर एक लाख कोटी परत दिले नाही तर ते देशभक्त व्यावसायिक होतात. हा फरक आमच्या देशात आहे. शेतकरी कारागृहात जात असेल आणि एक लाख कोटींचे कर्ज बुडवणारा विमानाने विदेशात पळत असेल तर हा विकास कसा? प्रगती, विकासाच्या नावावर आज देशात हे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून कुणाची प्रगती आणि कुणाचा विकास सुरू आहे हे सांगा? असा प्रश्नही गांधींनी उपस्थित केला.

लोक न्याय कसे मागायला लागले हा मोदींसमोर प्रश्न

या देशात जातीय जनगणनेचा विषय निघाल्यापासून नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. लोक न्याय कसे मागायला लागले हा प्रश्न त्यांना पडला आहे. जातीय जनगणनेमुळे या देशातील प्रत्येक गरिबाला त्याची किती शक्ती आणि किती संपत्ती आहे याची माहिती होईल. या देशात आमची भूमिका काय? हे सर्वांना लक्षात येईल. त्यामुळे आमची ही मागणी आहे. संविधान ज्याप्रमाणे जीवन जगण्याची पद्धती आहे तसेच जातीय जनगणना ही देशाच्या प्रगतीची ताकद आहे.

हेही वाचा…राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट, अभ्यागत पुस्तिकेत लिहिला ‘हा’ संदेश… त्याची सर्वत्र चर्चा

५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार

जगामध्ये भारतात सर्वाधिक असामानता आहे. ज्यांच्यावर अन्याय होत नाही त्यांना जात दिसणार नाही. जातीय जनणननेतून या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. आता संघ आणि भाजप जातीय जनणननेवर विचार करत आहेत. परंतु तुम्ही कितीही अडवण्याचे प्रयत्न केले तरी जातीय जनणनना होणार आहे. देशातील जनतेने पक्का विचार केला आहे. तुम्ही घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडली जाणार आहे. जनणननेतून संविधान वाचेल. यातूनच लोकांना समजेल की त्यांच्यावर काय अन्याय झाला. तेव्हा ते संविधान हातात घेऊन आपल्या अधिकारांसाठी लढतील. ९० टक्क्यांवर नियमित अन्याय होतो आहे, त्यामुळे सर्वात पहिले काम हे जातीय जनणनना आणि ५० टक्केची मर्यादा काढणे हे आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.