चंद्रपूर : देशातील प्रसार माध्यमे शेतकरी व गरिबांचा मुद्दा उचलून धरत नाहीत. माध्यमांमध्ये मजूर, शेतमजूर, शेतकरी दिसत नाहीत, आदिवासी, बेरोजगारीचा विषय दिसत नाही. अंबनीचा शाही विवाह सोहळा, अदानी, क्रिकेट सामने दिसतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा २४ तास दाखविला जातो, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी माध्यमांवर आगपाखड केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिमूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. मंचावर काँग्रेसचे संघटन महामंत्री के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, चिमूरचे उमेदवार डॉ. सतीश वारजुरकर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, रिपाइंचे भूषण गवई, माजी आमदार अविनाश वारजुरकर, बल्लारपूरचे उमेदवार संतोष सिंह रावत उपस्थित होते. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करतो, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करतात. मुंबईतील दलित, आदिवासी, मागासवर्गीयांची वस्ती धारावीची जमीन अदानींना देण्याचा निर्णय अशाच प्रकारे बंद खोलीत घेण्यात आला. त्याच पैशातून आमदारांची खरेदी करून मोदी व सहकाऱ्यांनी राज्यातील आघाडी सरकार पाडले, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चिमूर क्रांतीभूमीत केली.

हेही वाचा…मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…

चिमूरक्रांती भूमीतील तरुण इंग्रजांविरोधात लढले तसेच संविधानासाठी देखील लढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी या सर्वांचे विचार संविधानात आहेत. हजारो वर्षापासून संविधानासाठी लढाई या देशात सुरू आहे. मी व काँग्रेस म्हणते देश संविधानाने चालला पाहिजे तर संघ परिवार व भाजपचा संविधानाला विरोध आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की, लाल संविधान रिकामे आहे. मात्र संविधानाचे पुस्तक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रक्तापासून पुस्तक बनले आहे. संघ परिवारातील लोक संविधानाला मानत नाही. महाराष्ट्रातील आघाडी सरकार लोकांचे करोडो रुपये देऊन चोरी केले, असाही आरोप गांधी यांनी केला. धारावीची जमीन अदानीला दिली. धारावीत १० अतिश्रीमंत असते तर असे झाले नसते. दलित, आदिवासी, मागासवर्गीय या ठिकाणी बसले आहेत, म्हणून हा प्रकार होत आहे. श्रीमंतांना जेवढा पैसा दिला तेवढा तुम्हाला देऊ. देशातील २५ मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख करोड रुपये माफ केले. त्यामध्ये एकही आदिवासी, दलीत, मागासवर्गीय उद्योजक नाही. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. आदिवासी, दलीत, मागासवर्गीय देशासाठी शहीद झाले. देशातील शेतकरी, मजूर व बेरोजगारांचा मोदी अपमान करीत आहेत. संसद भवनात भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडावी व आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी विनंती केली. यासाठी मी तुमच्या सोबत आहे. जनगणना करा, अशीही विनंती केली. मात्र मोदी यांनी दीड तासाच्या भाषणात लोकसभेत यावर एक शब्द बोलले नाही. पंतप्रधान मोदी मंचावर वारंवार खोटे बोलतात, असेही गांधी म्हणाले. ‘संविधान बचाना है, नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान खोलना है,’ असे म्हणत राहुल यांनी देशात चार हजार किलो मिटर पदयात्रेत अनेक लोक भेटल्याचे सांगितले.

देशात जनगणना करावी, अशी आमची मागणी आहे. या देशात ८ टक्के आदिवासी, १५ दलीत, ५० ओबीसी आहे. मात्र त्यांच्या संख्येनुसार त्यांना लाभ मिळत नाही. अदानी, अंबानी, टाटा यांच्यासारख्या उद्योगपतींची यादी काढा त्यांच्या कंपनीत आदिवासी, दलीत, मागासवर्ग उच्चपदावर दिसणार नाही. सर्वात मोठ्या कंपनीची मालक दलित, आदिवासी व्हावे असे मला वाटते. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर जी.एस.टी. लावण्यात आला आहे. बजेट बनविण्यासाठी ९० आयएएस अधिकारी काम करतात. त्यात किती दलित, आदिवासी अधिकारी आहे, असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…मुख्यमंत्री शिंदेच पुन्हा ‘किंग’?… शिवसेना प्रवक्त्यांनी जे सांगितले त्यावरून…

राज्यात आघाडी सरकार आले तर तीन हजार रुपये बहिणींना देणार. महिलांसाठी बससेवा मोफत करणार, तीन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, सोयाबीन, कापूस, कांदा या शेतकऱ्यांनाही मदत करणार. आरोग्य विमा देणार, अशा घोषणाही राहुल यांनी केल्या. मोदी यांचे सरकार आहे तोपर्यंत देशात बेरोजगारी राहणारच, असेही ते म्हणाले.

चिमूर क्रांती भूमीतून परिवर्तन

राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात चिमूर क्रांती भूमीतून होईल. महाविकास आघाडी व काँग्रेसचा झेंडा येथे फडकणार आहे. ‘बंटी तेरी घंटी बजी’ अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी आमदार बंटी भांगडिया यांच्यावर टीका केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticized media for focusing on ambanis wedding adani and modi not on farmers rsj 74 sud 02