नागपूर/भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम, धर्म यांवर २४ तास बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. मात्र युवक ज्या बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे, त्यावर मात्र मौन बाळगतात, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील साकोली तालुक्यातील चांदूरवाफा येथे शनिवारी आयोजित त्यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार चंद्रकात हंडोरे उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मोदींनी काही निवडक उद्याोगपतींसाठी सरकार चालवले. यामध्ये गौतम अदानी यांच्यावर विशेष कृपादृष्टी होती. मुंबई विमानतळ त्यांना देण्यात आले. त्यासाठी सीबीआयचा वापर करण्यात आला. तसेच देशातील सर्व बंदरे, रेल्वे, खाणी, कोळसा, वीज अदानी आणि आणखी ९-१० अब्जाधीशांना वाटण्यात आली. सरकारच्या या धोरणामुळे जेवढी संपत्ती ७० कोटी लोकांकडे नसेल तेवढी संपत्ती केवळ या २२ उद्याोगपतींकडे जमा झाली.
हेही वाचा >>>केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
देशात बरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे मोदींना लक्ष देण्यास वेळ नाही. ते दिवसरात्र धर्म, हिंदू-मुस्लिम यांवर बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. ते कधी समुद्रात एकटेच पूजा करतात, त्यांना तेथे पुजारी लागत नाही. हवाई दलाच्या विमाने आकाशात उडतात. ते स्वत:ला ओबीसी म्हणतात. पण ओबीसींसाठी त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकही योजना आणली नाही, असे राहुल यांनी सांगितले.
प्रत्येक कुटुंबातील महिलेला ८५०० रुपये
केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही आंतरवासिता अधिकार देऊ. यामुळे प्रत्येक पदविका, पदवी प्राप्त युवकांना शासकीय, खासगी कंपनी, कार्यालयात एक वर्ष प्रशिक्षणाची संधी मिळेल. तसेच वर्षभरात एक लाख रुपये मिळू शकतील. पेपर फुटीविरुद्ध कायदा आणि शेतमाल खरेदीसाठी एमएसपी कायदा केला जाईल. शिवाय ३० लाख रिक्त पदे भरू, अग्निवीर योजना बंद करू, प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला महिन्याला ८५०० रुपये देण्यात येईल, असेही आश्वासन राहुल यांनी दिले.
नरेंद्र मोदी स्वत:ला ओबीसी म्हणतात. पण ओबीसींसाठी त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकही योजना आणली नाही. मग ते ओबीसी कसे? मोदींनी ओबीसींसाठी काय केले हे सांगावे? – राहुल गांधी