अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात राजकीय संवाद घडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधींनी संपर्क केल्याचे वंचित आघाडीतील सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढत होत असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभाप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आपले उमेदवार रिंगणात उतरवले. अनेक मतदारसंघात मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने मोठी खेळी करून वंचितला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न देखील केले. त्यामुळे अकोला पश्चिम, नागपूर मध्यसह अनेक ठिकाणी वंचित आघाडीवर नामुष्की ओढवली. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देखील अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. प्रचाराचा धुराळा उडत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली.

हेही वाचा…“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. उपचारातून बरे होतात प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय झाले आहेत. राहुल गांधी यांनी आज त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना प्रकृतीची विचारपूस केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यात नेमकी कुठली राजकीय चर्चा घडली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात राजकीय चर्चा घडल्याचे देखील बोलल्या जात आहे. यासंदर्भात अद्याप वंचित आघाडीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हेही वाचा…रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…

दरम्यान, समविचारी पक्ष म्हणून वंचित आघाडीने मविआचा घटक होण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी चर्चा घडवून आली होती. मात्र, लोकसभा व त्यानंतर आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील वंचितने स्वबळावरच दंड थोपटले आहेत. वंचितच्या कामगिरीकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi discussion on political communication over phone with vanchit bahujan aghadi president prakash ambedkar ppd 88 sud 02