नागपूर : लोकसभा निवडणुकीत संविधान संरक्षणाचा मुद्दा गाजला होता. केंद्रात पुन्हा मोदी सत्तेत आले तर संविधान बदलवणार अशी चर्चा भाजपच्याच काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सुरु झाली होती. व त्याचा आधार घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा मुद्दा जनतेच्या न्यायालयात मांडला. याचा फटका भाजपच्या नेतृत्वातील आघाडीला बसला. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. भाजपने संविधान बदलणार नाही, विरोधकांनी खोटा प्रचार केला असा दावा केला. या पार्श्वभूमीवर संघभूमी नागपूरमध्ये बुधवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन होत आहे. त्यात राहुल गांधी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृती मंदिरालगत असलेल्या सुरेश भट सभागृहात बुध‌वारी दुपारी हे स्ंमेलन होत आहे. राहुल गांधी येणार असल्याने सभागृहाबाहेर त्यांचे मोठे कटाआऊटस लावण्यात आले आहे. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली आहे. संविधान सन्मान संमेलन म्हणजे काय याची सध्या राजकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा…कारवाईची कुऱ्हाड, अमरावती जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

आयोजकांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळाला. हा घटक प्रगती करतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नेमकी हीच बाब त्यांच्या सभेत मांडत आहेत. संविधानाचे फायदे लोकांपर्यत पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या देशातील सामाजिक परिस्थिती ही लोकशाहीला बाधक ठरणारी तसेच संविधानाचा सन्मान न करणारी अशा प्रकारची होताना दिसत आहे. त्यामुळे संविधानाच्या सन्मानासाठी ज्याकाही स्वंयसेवी संस्था सध्या काम करीत आहे. त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे, त्यांच्या भावना राहुल गांधी यांच्यापर्यत पोहचाव्या आणि राहुल गांधीनाही या संस्थांच्या प्रतिनिधीशी संवाद साधता यावा, या भावनेने नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हेही वाचा…वर्धा जिल्ह्यात थेट लढत, उमेदवारांची कसोटी

राहुल गांधी या संमेलनाला येण्यापूर्वी नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नागपुरात पुन्हा एकदा संविानावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे भाजपने एक दिवसापूर्वीच या संमेलनापूर्वी पक्षाची भूमिका मांडताना काँग्रेसवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्यावर काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला, लोक आता त्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचार मिरवणुकी दरम्यान बोलताना केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi is holding constitution honors meeting in sanghbhoomi nagpur on wednesday cwb 76 sud 02