नागपूर : एप्रिल महिन्यात एकापाठोपाठ होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांमुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईतून नागपूरमध्ये स्थानांतरित होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सावरकर गौरव यात्रेने याची सुरुवात झाली असून १६ तारखेला महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यानंतर राहुल, प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. २७ एप्रिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संभाव्य दौरा आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय घडामोडींचे केंद्र मुंबईत होते. पण, आता एप्रिल महिन्यात नागपुरात होत असलेल्या कार्यक्रमांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सावरकर गौरव यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने भाजपने शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात यात्रा काढल्या. शंकरनगर चौकातील सावरकरनगर चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या ‘फडतूस’ला फडणवीस यांनी ‘काडतूस’ ने उत्तर दिले.
हेही वाचा… तब्बल चार मिनिटे ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ चंद्रपूरकरांना दिसले
दरम्यान, १६ एप्रिलला होणाऱ्या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेतेही सक्रिय झाले आहेत. दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला असतानाही नागपूर हा भाजपचा गड कसा, असा सवाल करून काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपला डिवचले. सभेसाठी दिलेल्या मैदानाची परवानगी रद्द करा, अशी मागणी करून भाजपने मविआचा रक्तदाब वाढवला. पण एकाच दिवसात ‘यु टर्न’ घेतला. महाविकास आघाडीच्यासभेनंतर काँग्रेसने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभेचे नियोजन केले आहे. राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघभूमीत शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा… रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द
२७ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नागपूर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचे नियोजन आहे. प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. एका कार्यक्रमात पंतप्रधान व सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा… ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’, पाहा व्हिडिओ..
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुढच्या काळात सर्वपक्षीय नेत्यांची वर्दळ नागपुरात वाढणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडण्याची शक्यता आहे. सध्या भाजप-ठाकरे गटातील राजकीय वाद शिगेला पोहचला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला बावनकुळे रोज नागपुरातून उत्तर देत आहेत. त्यातच काँग्रेसमधील देशमुख-पटोले यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नसल्याने हा महिना नागपूरसाठी राजकीय वादविवादांचा ठरण्याची शक्यता आहे.