गोंदिया : ‘जी- २०’चे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी सन्मानाची बाब आहे. भारताचा मान जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वाढतच चालला आहे. भारत देशाकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे काँग्रेसला भीती वाटत असून राहुल गांधी परदेशातून मदतीच्या शोधात आहेत. ते परदेशी संस्थांकडून मदत मागत आहेत. परदेशात जाऊन ते भारतावर टीका करतात. चीनबद्दल सहानुभूती दाखवतात आणि भारताबद्दल अविश्वास दाखवतात. हे निषेधार्थ आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे केली.
खासदार महोत्सवाच्या समारोपानिमित्त जिल्ह्यात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, सध्या काँग्रेसच्या लोकांना गांधी घराण्याऐवजी काहीही दिसत नाही. त्यांना देश दिसत नाही, देशातील संसद दिसत नाही. यामुळेच काँग्रेस अधोगतीच्या मार्गावर आहे. गुजरात, आसाममधून काँग्रेस संपली, नुकतीच त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मिझोरम या पूर्वोत्तर राज्यांतून काँग्रेस हद्दपार झाली आहे. यामुळे नाना पटोलेंनी लक्षात घ्यावे की, पुढल्या वेळी त्यांचापण नंबर लागू शकतो.
हेही वाचा >>> कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…
मोदी आणि अदानी संबंधांबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. काँग्रेसची देशात दीर्घकाळ सत्ता होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांच्या काळात अदानी आणि अंबानींसोबत त्यांचे संबंध कसे होते, किती प्रकारच्या सुखसुविधा आणि इतर बाबी ही मंडळी सत्ताधाऱ्यांना पुरवत होती, हे तपासले तर या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले. यावेळी खासदार सुनील मेंढे, गजेंद्र फुंडे उपस्थित होते.