गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उपस्थित जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत असताना “बटेंगे तो कटेंगे” “एक रहेंगे सेफ रहेंगे ” असे ठिकठिकाणी सांगत आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची, महात्मांची भूमी आहे. थोर महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्रात शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचार हा लोकांच्या ध्यानीमनी रुजलेला आहे, रक्त रक्तामध्ये भिनलेला आहे.
अशात गुजरातची स्टाईल, उत्तर प्रदेशची स्टाईल भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करीत असतील तर स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे उगाच या एकमेकात दुरावा निर्माण करणाऱ्या बाबीवर चर्चा करण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक हाताला काम आणि पोटाला अन्न आणि महाराष्ट्राला या देशाच्या एक नंबरचा राष्ट्र विकासाच्या बाबतीत कसे करता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने बोललं गेलं पाहिजे. कुणीही येऊन उत्तर प्रदेशचे विचार आमच्यावर थोपवू शकत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेश आणि गुजरातचे विचार महाराष्ट्रातील जनतेच्या माथी मारण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे पण मी हे त्यांना सांगू इच्छितो की उत्तर प्रदेश शेजारच्या हरियाणा येथे हे विचार कदाचित चाललेही असतील.
हेही वाचा…‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
पण संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हे विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता खपवून घेणार नाही, महाराष्ट्रातील जनतेला आज उच्च दर्जाचे शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा या गोष्टींची गरज आहे. करिता माझा योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या वरिष्ठांना असा सल्ला आहे की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेत दुरावा निर्माण व्हावा असे वक्तव्य प्रचार सभेतून करणे टाळावे. महाराष्ट्राच्या विकासा संदर्भात बोलावे, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी महायुतीच्या पक्षांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार बुधवारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता माध्यमांशी बोलत होते.