लोकसत्ता टीम
अकोला: औद्योगिक वसाहतीतील एका कृषी खत कंपनीवर पथकाकडून छापा टाकण्यात आला. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहायकासह काही खासगी व्यक्ती असल्याचे समोर आले. या पथकाने लाखो रुपयांची खंडणीची मागणी केल्याची तक्रार संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाने केली. त्यावर खुलासा करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसह सर्वांनाच छापे टाकण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. माझ्या सांगण्यावरूनच ते छापे टाकण्यात आले, त्यामध्ये माझे स्वीय सहायक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधील कृषी उत्पादन कंपनी आणि विक्रेता यांच्या गोदामावर जाऊन पुणे येथील कृषी उत्पादन गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत छापा टाकण्यात आला. कृषिमंत्र्यांच्या नावावर पथकाने औद्योगिक वसाहतीमधील अक्षत फर्टिलायझर कंपनीच्या गोदामावर छापा टाकल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक राजेश शिंदे यांनी कायद्याने कारवाई करण्याचा मुद्दा उचलला. छापा टाकण्यासाठी आलेल्या कृषी विभागाच्या पथकात चक्क कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वीस सहायक दीपक गवळी, प्रशांत ठाकरे होते.
आणखी वाचा-मॉन्सूनची गती वाढली, महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार
याशिवाय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन आणि नागपूर येथील हितेश भट्टड यांचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे, कृषी संबंधित घोटाळ्याचे अनेक गुन्ह्यांमध्ये हितेश भट्टड आरोपी आहे. या पथकाने लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने केला. हा आरोप झाल्यावर पथक माघारी फिरले. दरम्यान, अकोला दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सारवासारव केली. छापा टाकण्याचा अधिकार शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे. माझ्या सांगण्यावरूनच छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये माझ्या स्वीय सहायकाचा समावेश नव्हता. गैरकारभार खपवून घेणार नाही, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.