नागपूर : सेक्स रॅकेटचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलतरोडी आणि हुडकेश्वरमध्ये एका सदनिकेत गुन्हे शाखेने छापा घालून दोन तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले.
तरुणींना आंबटशौकीन ग्राहकांच्या ताब्यात देणाऱ्या दलाल महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. अंजली ऊर्फ नूतन काळसर्पे (३०, रा. तिरुपती टॉवर्स, बेसा पॉवर हाऊसजवळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ‘लोकसत्ता’ने शहरात अनेक ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सेक्स रॅकेटची संख्या वाढली होती. पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी एसएसबी पथकाला छापा घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी पथकासह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी पुलाजवळून बेसा पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या तिरुपती टॉवर्समधील तिसऱ्या माळ्यावरील एका सदनिकेत छापा घातला.
या छाप्यात २२ आणि २४ वर्षीय दोन तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी नागपुरातील असून अविवाहित आहेत. आरोपी महिला अंजली काळसर्पे हिने दोन्ही तरुणींना झटपट पैसे कमविण्यासाठी देहव्यापारात ओढले होते. अंजली ही गेल्या अनेक दिवसांपासून देहव्यापारात सक्रिय होती. तिच्या प्रियकरासह मिळून ती सेक्स रॅकेट चालवित होती. अंजलीने पतीला गेल्या काही महिन्यांपूर्वी सोडून दिले होते. तिला एक मुलगा असून आर्थिक परिस्थितीने खचलेल्या तरुणींना जाळ्यात ओढून देहव्यापार करवून घेण्याचे काम सुरू केले होते. पोलिसांनी दोन बनावट ग्राहकांना अंजलीच्या सदनिकेत पाठवले. ५ हजार रुपयांत सौदा ठरला.
तिने लगेच दोन्ही तरुणींना खोलीत ग्राहकांकडे पाठवले. त्यानंतर पोलिसांनी छापा घालून तरुणींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, संतोष जाधव, हवालदार सोनवणे, अश्वीन मांगे, लक्ष्मण चवरे, रिना जाऊरकर आणि पूनम शेंडे यांनी केली.