नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या पथकाने विदेशातून तस्करीच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्या टोळीतील ११ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून १९ कोटी रुपये किंमतीचे ३१.७ किलो सोने जप्त करण्यात आले. त्या सर्वांची सखोल चौकशी सुरू आहे. नागपुरात झालेल्या कारवाईत चार तस्करांना अटक करण्यात आली असून ८ किलो सोने जप्त करण्यात आले.
सोन्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ दुबईला आहे. नियमानुसार शासनाचा कर भरून बिस्किट स्वरूपात सोने आणले जाते. त्यानंतर कारागिरांकडून ऑर्डर नुसार आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने तयार केली जातात. दसरा, दिवाळीला दागिण्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. त्यासाठी बाजारपेठा आतापासूनच सजल्या आहते. हीच संधी साधून तस्कर दुबईतून चोरट्या मार्गाने सोने भारतात आणतात. विदेशातून तस्करीच्या सोन्याची बांग्लादेश सिमेवरुन वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती डीआरआयला मिळाली. नागपूर, मुंबई आणि वारानसी येथील डीआरआयच्या पथकाने समन्वय साधत १९ कोटी रुपये किंमतीचे ३१ किलो सोने जप्त केले.
हेही वाचा >>> बृहन्मुंबईत कोट्यवधींची चोरी अन् आरोपी अकोल्यात…
विदेशातून आणलेले सोने बांग्लादेश सिमेवरून भारतात आणून ते नागपूर, मुंबई आणि वारानसीत पोहोचविणार असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले. माहिती मिळताच नागपुरात सापळा रचून चौघांना अटक करण्यात आली. यातील दोघेही मुळचे नागपूरचे रहिवासी आहेत. दोघेही सुशिक्षित आहेत. त्यांच्या ताब्यातून जवळपास ९ किलो सोने जप्त करण्यात आले. त्यावर विदेशी छापा असल्याचे आढळून आले. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. वारानसीच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने तीन तासाच्या नाट्यमय कारवाईनंतर जंगल व रस्ते मार्गावर कार मधून १८.२ किलो सोन्यासह दोघांना पकडले. तसेच मुंबईच्या डीआरआय पथकाने पाच संशयितांना कोलकाता येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४.९ किलो सोने जप्त करण्यात आले.
सोन्याच्या तस्करीत टोळी
विदेशातून आणलेल्या तस्करीच्या सोन्याची भारतातील विविध शहरात वाहतूक करण्यात टोळी गुंतली आहे. नागपुरातून चार, मुंबईतून पाच आणि वारानसीतून दोन अशा अकरा तस्करांची सखोल चौकशी सुरू आहे. डीआरआयच्या चौकशी दरम्यान तस्कर एकमेकांवर आरोप करीत होते. मात्र, सखोल चौकशीत तस्करी केल्याचे त्यांनी मान्य केले.