अकोला : उन्हाळ्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय बेलगाम ते मऊ, वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर दरम्यान देखील अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत. या अतिरिक्त रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीच्या काळात रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्टी राहत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते. तीन महिन्यापूर्वीच रेल्वेचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले. नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने नियोजन केले. नागपूर ते पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत. क्रमांक ०१४४० विशेष गाडी १३ एप्रिल ते २५ मेपर्यंत दर रविवार रोजी नागपूर येथून १६.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सोमवार रोजी ०७.२० वाजता पोहोचेल. क्रमांक ०१४३९ विशेष गाडी १२ मार्च ते २४ मेपर्यंत दर शनिवार रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे रविवार रोजी १४.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबा राहणार आहे. आठ वातानुकूलित द्वितीय, १० वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर कार अशी गाडीची संरचना राहणार आहे.

या शिवाय बेलगाम ते मऊ साप्ताहिक विशेष गाडीच्या १२ फेऱ्या ६ एप्रिल ते ११ मेपर्यंत दर रविवारी होणार आहेत. क्रमांक ०७३२८ विशेष गाडी ०९ एप्रिल ते १४ मेपर्यंत दर बुधवार रोजी सुटणार आहे. वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या १८ फेऱ्या होणार आहेत. क्रमांक ०७३११ विशेष गाडी ०७ एप्रिल ते ०२ जूनपर्यंत दर सोमवार रोजी वास्को दि गामा येथून १६.०० वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे बुधवार रोजी १२.३० वाजता पोहोचेल. क्रमांक ०७३१२ विशेष गाडी १० एप्रिल ते ०५ जूनपर्यंत दर गुरुवारी रोजी मुजफ्फरपूर येथून १४.४५ वाजता सुटेल आणि वास्को दि गामा येथे शनिवार रोजी १४.५५ वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांचा तपशीलवार वेळ, थांबा आणि आरक्षण करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना करण्यात आले आहे.