नागपूर : रेल्वेगाड्यांमध्ये अनिधकृतपणे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध रेल्वेने मोहीम उघडली नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसात तब्बल २७ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. शिवाय विनापरवाना रेल्वेगाडी किंवा रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीस मनाई आहे. असे असताना विविध रेल्वेगाड्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उन्हाळ्यात कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा…छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान, तीन जिल्ह्यातील १२०० जवानांची संयुक्त कारवाई

केटरिंग निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान, पथकाने तीन दिवसांत वेगवेगळ्या गाड्यांमध्ये केलेल्या कारवाईत एकूण २७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. हे विक्रेते शिजवलेले खाद्यपदार्थ, अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या, पाकीटबंद नाश्ता, शीतपेये आणि चहा/कॉफी रेल्वेगाड्या आणि स्थानक परिसरात विक्री करताना आढळून आले.

७ मे रोजी नागपूर स्थानकावर चार अनधिकृत विक्रेते पकडले गेले. ८ मे रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एसी डब्यांच्या गेटजवळ पाण्याच्या बाटल्या आणि आंब्याच्या रसाचे बॉक्स ठेवण्यात आले होते. या प्रकरणी २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

हेही वाचा…दारु परवाना वितरणात गैरव्यवहार, एसआयटी चौकशीची मुनगंटीवारांची मागणी

१० मे रोजी नागपूर स्थानकावर नऊ अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. तसेच विविध रेल्वे गाड्यांमधून नागपूर ते बल्लारशाह स्थानकादरम्यान १४ जणांना पकडण्यात आले. अनधिकृत विक्रीमुळे केवळ प्रवाशांना गैरसोयच होत नाही तर त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो.

हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेली ‘ऑफर’ पराभूत मानसिकतेतून; नाना पटोले म्हणतात,”दररोज नवे ‘कार्ड’…”

रेल्वेच्या आवारात किंवा रेल्वेगाड्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. प्रवाशांनी अनधिकृत विक्रेते आढळल्यास तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway crackdown 27 unauthorized food vendors arrested in nagpur division rbt 74 psg
Show comments