गोंदिया:- छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे रविवार ३० मार्च पासून सुरू झालेला बम्लेश्वरी देवस्थान, डोंगरगड यात्रा ही ७ एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. यात्रेला होणारी मोठी गर्दी बघता नागपूर रेल्वे विभागा कडून विशेष व्यवस्था करण्यात आली. यात अतिरिक्त रेल्वे सेवा, सर्व जलद (मेल/एक्सप्रेस) गाड्यांच्या थांबा, काही गाड्यांचे तात्पुरते थांबे सोबतच ५ लोकल गाड्या पूर्ववत करणे, जत्रेसाठी लोकल ट्रेनचा, स्पेशल लोकल ट्रेनचा जवळील मोठ्या स्थानका पर्यंत विस्तार, जलद (मेल/एक्स्प्रेस) गाड्यांमध्ये १ अनारक्षित कोचची तात्पुरती वाढ, या सह अतिरिक्त तिकीट काउंटर, बुकिंग काउंटर, ३ स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन तैनात केली आहे ज्यामुळे तिकिटांसाठी रांगा कमी झाल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था मध्ये प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ६५ रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

इतर व्यवस्था अंतर्गत फूट ओव्हर ब्रिज येथे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नागरी संरक्षण पथके तैनात करण्यात आली आहे. मदत केंद्रांवर प्रवाशाना मदत करण्यासाठी स्काउट आणि मार्गदर्शक तैनात केलेले आहे. डोंगरगढ रेल्वे स्थानकाची प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यासाठी २ मोठ्या तात्पुरते प्रवासी विश्राम गृह तयार करण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त सार्वजनिक सुविधा (शौचालय आणि पिण्याचे पाणी) पुरविण्यात आल्या आहेत.सर्व विभागांच्या कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची २४ × ७ तास तैनाती ची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी बम्लेश्वरी देवस्थान, मंदिर समितीशी समन्वय प्रस्थापित करण्यात आला. प्लॅटफॉर्म, परिभ्रमण क्षेत्र, तात्पुरते विश्राम गृह इत्यादी चांगल्या प्रकाशासाठी अतिरिक्त प्रकाशाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर कारवाई

रेल्वे संरक्षण दल, द.पू.म.रेल्वे, नागपूर विभागातर्फे प्रवासी गाड्या/स्थानकांमध्ये पुरेशा आणि योग्य कारणा शिवाय धोक्याची साखळी ओढणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये गाड्यांमध्ये विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये एकूण ८४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ८३४ जणांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून ३ लाख ५९ हजार १९५ रुपयांचा दंड न्यायालयाने वसूल केला आहे. तर वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण २०८ प्रकरणात १९३ जणांना अटक करून १६ हजार ९०० रुपयांचा दंड न्यायालयाकडून वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार चेन पुलिंग हा कायदेशीर गुन्हा आहे, ज्यामध्ये दोषी आढळल्यास एक वर्ष कारावास किंवा १००० रुपये दंड किंवा दोन्ही ठोठावण्याची तरतूद आहे. हा केवळ कायदेशीर गुन्हाच नाही तर सामाजिक दुष्कृत्यही आहे. हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ज्यासाठी रेल्वे संरक्षण दल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग प्रयत्नशील असून विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर कडक कारवाई करून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिला आहे.