अकोला : माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी देशातील विविध रेल्वेस्थानकावर ‘गती शक्ती टर्मिनल’ विकसित केले जात आहेत. या ‘टर्मिनल’मुळे माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची कार्यक्षमता वाढते. अकोला रेल्वेस्थानकावर ‘गती शक्ती टर्मिनल’ देण्याचे सूतोवाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासह संपूर्ण विद्युतीकरण करून अकोला रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वे प्रकल्पांसंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला. अकोला रेल्वेस्थानक मध्य व दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर पाच जिल्ह्यातील प्रवाशांची गर्दी राहत असून मालवाहू व प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न अकोला स्थानकावरून रेल्वेला प्राप्त होते. एकेकाळी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय अकोल्यात होते, अशी माहिती खासदार धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिली.
अकोला रेल्वेस्थानकाच्या विस्तारासोबतच मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर विविध प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे. कापूस, संत्रा उत्पादकांसाठी शकुंतला रेल्वे गाडीचा मार्ग उपयुक्त असून त्याचे ब्रॉडगेज करण्याच्या कामाला देखील मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. अकोला व मूर्तिजापूर येथे नवीन बांधकामे, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ती गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टिने संबंधितांना सूचित करण्यात यावे, असे खासदार धोत्रे म्हणाले. पारस व बोरगावमंजू रेल्वेस्थानकांचा विस्तार करण्यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. अकोट-खंडवा रेल्वेमार्ग लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. दहा राज्यांना जोडणारा हा मार्ग असून त्याचे कार्य, तांत्रिक अडचणी व निधी या संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. हा मार्गी गतीने पूर्ण केला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
नागपूर-पुणे अमृत रेल्वे सुरू करा
अकोल्यासह विदर्भातून मोठ्या संख्येने प्रवासी पुणे येथे जातात. त्यामध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. या मार्गावरील गाड्यांना सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याने नागपूर – पुणे अमृत रेल्वे सुरू करण्याची मागणी अनुप धोत्रेंनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. प्रयागराजसाठी सुरू केलेली गाडी कायम ठेवावी तसेच राजस्थानकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात यावी, दक्षिण भारताला जोडणाऱ्या नवीन गाड्या अकोला मार्गे सुरू करण्यात याव्या आदी मागण्या देखील खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. नवीन रेल्वे गाड्यांसंदर्भात चाचपणी करण्यात येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.