लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : रेल्वे अधिकाऱ्याने अविवाहित असल्याचे सांगून एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. विवाहित असल्याचे सत्य उघडकीस येताच महिलेने पोलिसांत लेखी तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरुन रेल्वे अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शैलेंद्र कुमार (४३, खैरी, कामठी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र कुमार हा रेल्वे विभागात अधिकारी आहे. त्याची ऑगस्ट २०२१ मध्ये दत्तवाडीत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेशी ओळखी झाली. त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्याने तिला मदत करण्याचे आमिष दाखवून मैत्री केली.

शैलेंद्रने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला अविवाहित असल्याचे सांगितले. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नास होकार दिला. तो महिलेच्या घरी जायला लागला. तिला शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला.

मात्र, महिलेने त्याला वारंवार नकार दिला. त्यामुळे त्याने महिन्याभरात लग्न करण्याचे आमिष महिलेला दाखवले. महिला त्याच्या आमिषावर भाळली. गेल्या ऑगस्ट २०२१ पासून शैलेंद्र हा महिलेवर लैंगिक अत्याचार करायला लागला. शैलेंद्र तिला बाहेरगावी नेऊन शारीरिक शोषण करीत होता.

असा झाला उलगडा

शैलेंद्र कुमार हा रेल्वेत अधिकारी असल्यामुळे तो नेहमी ड्युटीवर जात असल्याचे सांगून आपल्या कुटुंबियांना भेटायला जात होता. त्यामुळे महिलेला संशय आला. तिने शैलेंद्रवर पाळत ठेवली. तो महिलेच्या घरी आला. रात्रभर थांबल्यानंतर ड्युटीवर जात असल्याचे सांगून दुसऱ्या निघून गेला. मात्र, महिलेने त्याचा पाठलाग केला. तो थेट खैरी येथील स्वत:च्या घरी गेला. तेथे तो पत्नी व दोन मुलांसह राहत होता. ती महिला तेथून घराकडे परतली.

लग्नास नकार, बलात्काराचा गुन्हा

महिलेने शैलेंद्र कुमारला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, तो वारंवार वेळ मारुन नेत होता. शैलेंद्रच्या पत्नी व मुलांचे फोटो महिलेने त्याला दाखवले. त्यामुळे तो घाबरला. लग्न न केल्यास बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे शैलेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखवून काही दिवस थांबण्यास सांगितले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी तो महिलेच्या घरी आला. त्यावेळी महिलेने त्याला पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याची गळ घातली. मात्र, शैलेंद्रने तिला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या महिलेने नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन शैलेंद्र कुमार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.