राज्य शासनाच्या विशेष बैठकीत निर्णय
प्रलंबित आणि प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांच्या संदर्भात बुधवारी राज्य शासनाने घेतलेल्या विशेष बैठकीत विदर्भाशी संबंधित काही प्रकल्पांबाबत निर्णय झाल्याने या प्रकल्पांना पुढच्या काळात चालना मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत रेल्वे आढावा बैठक झाली. यात मुंबईसह राज्यातील इतरही भागातील रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विदर्भ मराठवाडय़ासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाकरिता उर्वरित भूसंपादनाचे काम २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. बडनेरा येथील व्ॉगेन कार्यशाळेचे काम १०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विदर्भातील नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या वाटय़ाची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. या प्रकल्पासह विविध भागातील रेल्वे उड्डाण पूल, विविध स्थानकांवर सरकते जीणे बसविणे, रेल्वेस्थानकावरील सुविधा, रेल्वे मार्गात येणारी झाडे तोडणे आणि इतरही बाबींवर या बैठकीत चर्चा झाली आणि यावर कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे ठरले.
बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील यवतमाळ -नांदेड प्रकल्पाचे काम अनेक वर्षांंपासून रेंगाळले असून त्यासाठी त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी संसदेतही प्रश्न मांडले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात रेल्वेचे जाळे विनले जावे ही मागणीही जुनी आहे. सरकारने ती मान्य केली असली तरी निधी अभावी हे काम होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत याबाबत चर्चा केल्याने यातून काही तरी सकारात्मक चित्र पुढच्या काळात निर्माण होईल, अशी शक्यता आहे.