लोकसत्ता टीम
बुलढाणा: जिल्हा रेल्वे लोक आंदोलन समितीच्यावतीने चिखली येथे १२ जानेवारीपासून सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाकडे शासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष कायम आहे. याचा निषेध म्हणून तीन पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेत अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला.
खामगाव जालना रेल्वे मर्गाकरिता राज्य शासनाने ५० टक्के निधीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता द्यावी यासाठी चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला २१ दिवस झाले असून शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा व शासनाचा निषेध म्हणून शिवसेनेचे ( शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, बाजार समितीचे संचालक नितीन राजपूत, यांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासत अनोखे आंदोलन केले.
आणखी वाचा-दिल्लीहून हैदराबादसाठी विमान उडाले, पण प्रवाशाला अपस्मारचा झटका आल्याने…
१३ जानेवारी रोजी चिखली येथील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन ५० टक्के निधी देईल अशी घोषणा केली. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताच ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने चिखली येथील तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह व साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, वकील संघ यांचा पाठींबा वाढत आहे. मात्र सत्ताधारी पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी आला नाही. त्यामुळे या युवकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आज स्वतःला काळे फासले असून आंदोलन दुर्लक्षितच राहिले तर आम्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी , मंत्री व पालकमंत्री यांच्या तोंडाला देखील काळे फासण्यास मागे पुढे बघणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, सुर्यकांत मेहेत्रे, रामकृष्ण लोखंडे उपस्थित होते.