नागपूर : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण करून रेल्वेने पळून घेऊन जाणाऱ्या प्रियकराला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर पोलिसांनी व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या छायाचित्रावरून पथकाने त्याचा शोध घेतला. चौकशी केल्यानंतर बुटीबोरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

अयान (२२) असे त्या अपहरणकर्ता युवकाचे नाव आहे. त्याला आई वडिल आहेत. तो बुटीबोरी परिसरात मजुरी करतो. त्याला दारूचे व्यसन असून घरच्यांशी वाद घालतो. त्यामुळे त्याला घरच्यांनी बोलणे सोडले आहे. कामाच्या ठिकाणापासून काही अंतरावर पीडित मुलगी सोनम (काल्पनिक नाव) राहते. ती दहाव्या वर्गात शिकते. सोनमच्या कुटुंबाशी आयनची ओळख झाली. तो अधून मधून त्यांच्या घरी जायचा. पीडित मुलीशी जवळीक साधली. तिच्याशी नेहमीच तो बोलायचा. अल्पवयीन असल्याचे पाहून तिला जाळ्यात ओढले. अलिकडे तो नेहमीच घरी जावू लागला. कुणकुण लागताच कुटुंबीयांना त्याला घरी येण्यास मनाई केली. तसेच पीडितेलाही त्याच्यापासून दूर राहण्यास बजावून सांगितले. दुरावा असह्य होत असल्याने त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला.

१८ एप्रिलच्या रात्री पीडितेला सोबत घेतले. दोघेही इतवारी रेल्वे स्थानकावर पोहोचले.  ईतवारी-तिरोडी पॅसेंजरने निघाले. दरम्यान बराच वेळ होऊनही मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. नंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन बुटीबोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. दरम्यान अयानकडे मोबाईल होता. तांत्रिक पध्दतीने मोबाईलचे लोकेशन घेतले असता तो इतवारी रेल्वे स्थानक मिळाला.

आरपीएफच्या पथकाने असा घेतला शोध

बुटीबोरी पोलिसांनी त्वरीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सहायक निरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन (तुमसर, चौकी प्रभारी) यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या व्हॉट्स ॲपवर मुलाचे छायाचित्र पाठविले. त्या आधारावर पथकाने रेल्वे स्थानक आणि  ईतवारी-तिरोडी पॅसेंजरमध्ये शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेच शोध लागला नाही. दरम्यान सहायक उपनिरीक्षक एस. के. साहू यांनी पथकासह महकेपार स्थानकावर शोध घेतला असता एक युवक संशयास्पद मिळून आला. बालिका तोंडाला कापड बांधून होती. छायाचित्रावरून युवकाची ओळख पटविली. त्याची चौकशी करून इतवारी स्थानकावर आणले. या घटनेची माहिती मुगीसुद्दीन यांना देण्यात आली. अपहरणकर्त्याची खात्री पटल्यानंतर दोघांनाही बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त  दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.