लोकसत्ता टीम
अकोला: अमरावती एक्सप्रेसमध्ये दिव्यांग पत्नीसोबत पती व त्यांची दोन मुले प्रवास करीत होते. दिव्यांग डब्ब्यात गर्दी असल्याने दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासाठी पती व दोन मुले अकोला रेल्वेस्थानकावर उतरले. पती दुसऱ्या डब्ब्यात चढले, मुले मात्र रेल्वेस्थानकावर असताना गाडी सुटून गेली.
त्या मुलांच्या मदतीला रेल्वे पोलीस धावून आले. त्यांनी दुसऱ्या गाडीने शेगाव गाठले आणि आई-वडिलांची भेट घडवून आणली. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री अकोला रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री घडला.
आणखी वाचा-वर्धा: लग्नास नकार म्हणून प्रेयसीस जाळण्यासाठी पाठलाग, प्रियकरास अटक
गजानन इंगळे हे त्यांची दिव्यांग पत्नी व दोन मुले सुचित (१४), संस्कृत (६) यांच्यासह अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे जात असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास अमरावती एक्सप्रेस अकोला रेल्वेस्थानकावर आली. दिव्यांगाच्या डब्ब्यामध्ये गर्दी असल्याने गजानन इंगळे व त्यांची दोन मुले दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर उतरले.
ते जनरल डब्ब्यात चढण्यासाठी जात असताना गजानन इंगळे हे गाडीत चढले; परंतु दोन लहान मुले खालीच राहून गेली. गाडी रवाना झाल्यानंतर याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले. शेगाव रेल्वे पोलीस ठाणे येथे मुलांच्या आई-वडिलांना गाडीमधून खाली उतरून घेण्याची माहिती दिली. तसेच सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलीस अंमलदार व चाइल्ड लाईन सदस्य यांच्यासह दुसऱ्या रेल्वेने शेगाव येथे पाठवण्यात आले.
आणखी वाचा-नागपूर: महिला डॉक्टरचे अश्लिल चलचित्र, ‘त्या’ डॉक्टरला अटक
दोन्ही मुलांना सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या सतर्कतेने मुलं व आई-वडिलांची भेट घडून आली.