गोंदिया:– गोंदिया जिल्ह्यातील रेल्वेनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हाळी सुटीचे वेध आता पासूनच लागले असून, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातून व्हाया गोंदिया मार्गे धावणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांचे तिकीट पुढील दोन-अडीच महिने म्हणजे जून , जुलै पर्यंत फुल्ल झाले आहे. परिणामी ऐनवेळी सुटीच्या हंगामात प्रवासाचा बेत करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अशातच मात्र यंदा रेल्वेला पर्यटन पावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दर वर्षीच उन्हाळ्यात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, काही रेल्वे एजंट कडून भरमसाट तिकीट बुकिंग करून या आगाऊ बुकिंग केलेल्या तिकिटांचा काळाबाजार करण्याचा प्रकारही या मुळे नाकारता येत नाही. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिते साठी आवाहन पेलावे लागणार आहे.
मुख्य रेल्वे मार्ग आणि सोईस्कर असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरीक एस.टी. बस सह रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने येथून तिरुपती बालाजी सह मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, गोरखपूर, सुरत , अहमदाबाद, जयपूर, प्रयागराज, लखनऊ आणि चांदाफोर्ट मार्गे हैदराबाद, बंगळुरू , चेन्नई, तिरुअनंतपुरम, कोच्ची आदी महत्त्वपूर्ण शहरांत रेल्वेसेवा सर्व प्रवाशांसाठी आधीच नियोजन केल्यास अत्यंत किफायतशीर आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक वरून देशाच्या चारही कोपऱ्यात रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे गोंदिया स्थानक मध्यवर्ती स्थानक म्हणूनही ओळखले जात आहे. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या तर शालेय परीक्षा पूर्ण व्हायला अजून किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीत बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन सुरू झाले आहे. आतापासूनच साधारण जून च्या पहिल्या आठवड्या पर्यंत प्रमुख रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षांनंतर बाहेर पर्यटनास जाण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांच्या रेल्वे सुविधेचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आहेत प्रमुख गाड्या गोंदिया स्थानकावरून धावणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस आणि दक्षिणे कडील सर्व गाड्यांना पुढील १५ जूनपर्यंत जवळपास १०० ते २००/ २५० पर्यंत तिकिटांचे वेटिंग आहे. त्यामुळे ऐन वेळेवर सुट्यांचा बेत आखणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.