एका तोतया पोलिसाला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या गणवेशात होता. त्याला बुधवारी सकाळी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी पकडले.विनोदकुमार (२०, रा. बगलिया क्वॉटर, आगरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोदकुमार हा नागपुरात सैन्य भरतीसाठी आला होता. तत्पूर्वी त्याने आगऱ्यावरून पोलीस गणवेश खरेदी केला. इंटरनेवरून पोलिसांचे नाव शोधले. अरुण फौजदार हे नाव त्याला पसंत पडले. त्यामुळे या नावाची नेमप्लेटही त्याने बनवली आणि गणवेशावर लावली. याशिवाय त्याने ब.नं.१८२०१४८७० क्रमांक नेमप्लेटवर लिहिला होता. त्याच्याजवळ ओळखपत्रही होते. बुधवारी सकाळी तो नागपूर रेल्वे स्थानकावर आला. फलाट क्रमांक एकवर तो फिरत असताना कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना संशय आला. त्यांनी लगेच त्याची चौकशी केली आणि लोहमार्ग उपनिरीक्षक रवी वाघ यांना बोलावले. विनोदकुमारला आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. नंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.