अकोला : मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या टीसीवर अल्पवयीन मुलीच्या छळाचा गंभीर आरोप होता. त्यामुळे पोलीस कारवाईच्या भीतीतून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमेध मेश्राम असे आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून घरगुती कारणामुळे सुमेध मेश्राम (४०) हे तणावात होते. काल रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतली. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मूर्तिजापूर पोलीस व रेल्वे पोलिसांनी धाव घेतली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोला लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सुमेध मेश्राम यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. एका १४ वर्षे अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मेश्राम यांच्यावर अत्याचार केल्यासह विनयभंग, बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे झाले होते. पीडित मुलीवर मूर्तिजापूर शहरातील एका कॉलनीमध्ये घरातील खोलीत बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप मेश्राम यांच्यावर होता.

२०२२ ते २०२५ सलग तीन वर्ष अत्याचार करण्यात आला. कुणाला काही सांगितले तर आईसह तुला मारून टाकू, अशी धमकी देखील पीडितेला त्यांनी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. पीडित मुलीला गुंगीचे औषध देखील दिले होते. पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. आईने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मृतक सुमेध मेश्राम यांच्यावर ६४ (२) (एम), ७४ (२) (एफ), ६५ (१), ६५ (२), ३५१ (३) सहकलम ४, ६ पोक्सो प्रमाणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढे हा तपास मूर्तिजापुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलीस सुमेध मेश्राम यांच्या मागावरच होती. पोलीस कारवाई होऊन अटक होण्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे मूर्तिजापूर शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाची चर्चा होत आहे.