मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय रुग्णालय कायम कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. रुग्णांना योग्य प्रकारे उपचार न मिळणे, योग्य सुविधा न उपलब्ध होणे, डॉक्टर वेळेवर न येणे अशा तक्रारी असतात. पण, आता रुग्णाना शस्त्रक्रिया गृहात (ऑपरेशन थिएटर) नेण्यासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट बंद पडल्याची घटना समोर आली.
हेही वाचा >>> भंडारा जिल्ह्यात दलित – सवर्ण वाद; जातीवाचक शिवीगाळचा आरोप; ७ जणांवर गुन्हे
विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या शेजारी रेल्वेचे रुग्णालय आहे. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयावर तेथे उपचार केले जातात. अशा स्थितीत तेथील उपकरणे अद्यावत असणे आणि तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त असणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ एक मजल्याच्या या रुग्णालयात लिफ्टची देखभाल दुरुस्ती नीट होत नसल्याचे दिसून आले आहे. येथील लिफ्ट रुग्णांना पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया दालनात येण्यासाठी आहे. सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास महिला कर्मचारी पूजा वाघमारे या लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर जाण्यास निघाली. पण, लिफ्ट वर जात नव्हती. शिवाय लिफ्टचे प्रवेशद्वार देखील उघडत नव्हते. सुमारे अर्धा तास ही महिला लिफ्टमध्ये अडकून पडली होती. इलेक्ट्रीशियनला बोलावून त्या महिलेची सुटका करण्यात आली.