अमरावती : भर उन्हाळ्यात विदर्भवासीयांसाठी पुणे प्रवास खडतर बनला आहे.झारखंडमध्ये सुरू असलेल्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे दुरांतो एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस आणि आझाद हिंद एक्सप्रेस अशा अनेक प्रमुख एक्सप्रेस सेवांसह एकूण २६ गाड्या १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे कनेक्शन सुलभ करण्यासाठी दक्षिण पूर्व रेल्वेने ब्लॉकची घोषणा केली आहे, ज्यामुळे २४ एप्रिल पर्यंत रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे. त्याचा फटका विदर्भातील प्रवाशांना बसला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून, रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे; पण रेल्वेकडून बिलासपूर विभागातील चौथ्या मार्गावरील ‘कनेक्टिव्हिटी’चे काम सुरू करण्यात आले आहे.२३ एप्रिल पर्यंत हे काम चालणार आहे. त्याचा परिणाम काही रेल्वे गाड्यांवर झाला आहे. त्यामुळे या वेळांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस १० ते १९ एप्रिल आणि पुन्हा ११ ते २४ एप्रिल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस ११ आणि २४ एप्रिल रोजी धावणार नाही. हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस १० ते २१ एप्रिल दरम्यान रद्द राहील. इतर प्रभावित गाड्यांमध्ये पोरबंदर-शालीमार एक्सप्रेस (९-१९ एप्रिल) आणि मुंबई-शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (११-२४ एप्रिल) यांचा समावेश आहे.विदर्भातून पुणे येथे ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि आझाद हिंद एक्स्प्रेस या दोनच गाड्या दररोज नियमित धावतात. इतर सर्व गाड्या वेगवेगळ्या दिवशी आहेत. त्यातही आझाद हिंद एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.
२०८२२ संत्रागाछी -पुणे हमसफर एक्स्प्रेस नागपूरहून दर रविवारी धावते, पण १३ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २०८२२ पुणे-संत्रागाछी एक्स्प्रेस १४ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस देखील १७ आणि १९ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे, तर पुणे-हावडा १९ आणि २१ एप्रिल रोजी धावणार नाही, त्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.