अमरावती : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीतूनही उत्पन्न वाढवले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यातून महसुलात ३९.५३ टक्क्यांची भर पडली आहे. भुसावळ विभागाने २०२३-२४ या वर्षात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीतून ३.०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०२४-२५ या वर्षात विभागाने ४.२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सामान वाहतुकीतूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६७.११ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या विभागाला २०२३-२४ मध्ये सामान वाहतुकीतून १.४९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. २०२४-२५ मध्ये हे उत्पन्न २.४९ कोटी रुपयांवर पोहचले आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीतून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर कोणालातरी सोडायला जातो. त्यावेळी आपण प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करतो. कारण प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असणे फार गरजेचे असते. जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटशिवाय रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश केला तर अशावेळी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्लॅटफॉर्मवर रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्यांपेक्षा सोडणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने अशा लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणे बंधनकारक केले आहे.

किती वेळ थांबू शकता?

१० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही, रेल्वेच्या नियमानुसार, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यापासून तुम्ही फक्त २ तास स्टेशनवर थांबू शकता. म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता फक्त २ तास आहे. म्हणून पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला स्टेशनवर घ्यायला किवा सोडायला जाल तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट अवश्य खरेदी करा, त्या वेळेकडे विशेष लक्ष द्या. असे होऊ नये की, तुम्ही दोन तासांपेक्षा अधिक काळ प्लॅटफॉर्मवर थांबला आणि तुम्हाला दंड भरावा लागला.

प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यास दंड

जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढायला विसरलात तर रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी तुमच्याकडून किमान २५० रुपयांचा दंड आकारु शकतात. एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक दंड म्हणून त्या प्लॅटफॉर्मवरुन निघालेल्या मागील रेल्वेगाडीच्या किवा त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या रेल्वेगाडीचे दुप्पट भाडे देखील आकारले जाऊ शकते.

प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध जागेनुसार प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातात.प्लॅटफॉर्मच्या क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे दिली जात नाहीत. जर क्षमतेनुसार प्लॅटफॉर्म तिकिटे आधीच दिली गेली असतील, तर रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्म तिकीट मागणाऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यास नकार देऊ शकतो.