वर्धा : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी घायकुतीस आला आहे. शेकडो एकर शेतात पाणी साचले असून प्रामुख्याने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यास पावसाने झोडून काढले आहे. एकशे आठ गावांना मोठा फटका बसला. वीज पडून आतापर्यंत ७५ जनावरे दगावली असून त्यात देवळी तालुक्यातील ६५ मेंढ्यांचा समावेश आहे. तीनशे चार कुटुंब मुसळधार पडल्याने बाधित झाली आहेत. सर्वाधिक पिकाचे नुकसान आर्वी तालुक्याचे झाले आहे.
हेही वाचा – अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आता एका ‘क्लिक’वर
संत्रा, पपई बाग गळून पडली. पन्नास पशू गोठे ध्वस्त झाले. खपरी येथे मुन, देठे, मीरा गायकवाड, मोहन भोयर यांचे संसार उघड्यावर आले आहेत. वडनेर बंभली या मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. तसेच बांबर्डा ते टेंभा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. या पुलाची उंची वाढवावी म्हणून सातत्याने मागणी होत असते. आजही पावूस सुरूच असल्याने ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे.