लोकसत्ता टीम
वर्धा : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना बघण्यास व ऐकण्यास वर्धेकर रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. पण पावसाने या उत्साहावार विरजण टाकल्याने खेर यांच्या गायनाची काही खैर राहली नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे स्वावलंबी शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी सहाची वेळ देण्यात आल्याने रसिक पाचपासूनच गर्दी करू लागले. त्यात व्हीआयपी पास असलेले अडकले. मात्र कसेबसे पोहचले आणि त्यातच पावसाचे आगमन झाले. जो तो आडोसा शोधू लागला. शेवटी मिळून काहींनी जमिनीवर टाकलेली मॅट डोक्यावर धरली. पण त्याने पावसापासून काही बचाव होत नसल्याचे दिसून आल्याने बसण्यासाठी आणलेल्या खुर्च्याच लोकांनी डोक्यावर धरल्या.
रात्रीचे नऊ वाजले तरी खेर यांचे आगमन होत नसल्याचे पाहून डोक्यावर खुर्ची घेत लोकं पाय काढता घेऊ लागले. खुर्चीत शीर आणि खाली धड, असे गमतीदार दृष्य सर्वत्र दिसू लागले. गायक कैलास खेर यांचे पावसातच आगमन झाले. सोबत खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ, भाजपचे पदाधिकारी स्टेजवर पोहचले. लोकांना अभिवादन करीत कार्यक्रम आटोपता घेण्याचा निर्णय झालाच होता. पण गायनास सुरवात करीत नाही तोच तांत्रिक अडचण आली. माईक बंद पडला. चालायला तयार होत नव्हता. एव्हाना नऊ वाजून गेले होते. दोन वेळा माईक बंद पडूनही श्रोते शांतच. शेवटी श्रोत्यांनीच खेर यांचे गाणे म्हणणे सूरू केले. दरम्यान माईक सूरू झाल्यावर खेर गाते झाले. जय, जयकारा व अन्य एक गीत सादर झाले. पुन्हा भेटू म्हणत त्यांनी निरोप घेतला. परत पावसाचे आगमन झाले. इकडे तोपर्यंत मैदान ओस पडले होते.
रात्रीचे दहा वाजले. भिजून चिंब झालेले लोकं डोक्यावर खुर्चीचा आडोसा घेत निघून गेले होते. याचा चांगलाच फटका आयोजकांना बसला. दहा हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. अर्ध्या लंपास झाल्याचे मैदानावरील चित्र होते.या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे अडीच कोटी रुपयाचे बजेट असल्याचे सांगितल्या जात होते. पहिल्या दोन दिवशी स्थानिक कार्यक्रम झाले. त्यास अपेक्षित तेव्हढा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र रविवारी असलेल्या कैलाश खेर यांच्या गायन कार्यक्रमाची चांगलीच प्रसिद्धी झाली होती. म्हणून एकच गर्दी उसळली. परंतू पाऊस, तांत्रिक अडचणी, झालेला विलंब यामुळे लोकांना आनंद घेता आला नाही.