नागपूर : राज्यात जुलै महिन्याच्या मध्यान्हापासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. मात्र, सातत्याने कोसळणारा पाऊस आता काहीशी विश्रांती घेणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुर्यनारायणाचे दर्शन होण्याची शक्यता आहे.

मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल झाला, पण नंतर पावसाने दडी मारली. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यान्हात सुरू झालेला पाऊस सातत्याने कोसळत राहिला. आधी वाट पाहायला लावणारा आणि नंतर मोसमी पाऊस सातत्याने कोसळत राहिल्याने राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या, तर धरणाची दारे उघडावी लागल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. श्रावण महिन्याला सुरुवात झाली तरीही अविरत कोसळणारा पाऊस मात्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे अनेकांच्याच चिंतेत भर पडली होती. दरम्यान आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता हा पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसणार आहे.

हेही वाचा – नोकरीच्या आमिषाला बळी पडून ‘ती’ मध्यप्रदेशातून नागपुरात आली; मग जे घडले ते…

कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही. तर आतापर्यंत झाकोळला गेलेला सूर्य आता पुन्हा दिसणार आहे. किमान पुढील चार दिवस तरी ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळेल, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. राजस्थानचा आग्नेय भाग आणि नजीकच्या भागावर सक्रिय असणारे कमी दाबाचे क्षेत्र आता निवळण्यास सुरुवात झाली असून, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या उत्तरेपर्यंत मात्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. मुसळधार पाऊस मात्र सध्या तरी नाही. पावसाचा जोर काही अंशी ओसरत असतानाच तिथे कोकणातील रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या भागांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भाला हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा – सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर का संतापले?

राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक वर्षानंतर यंदाच्या पावसाळ्यात मोसमी पाऊस दिसून आला. गेल्या काही वर्षात तासाभरात मुसळधार कोसळणारा पाऊसच अनुभवायला येत होता. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाची सवय होती. त्यामुळे लगेच पूरस्थिती निर्माण होत होती. यावर्षी मात्र मान्सूनसारखा पाऊस कोसळत आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातही सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडणार असे भारतीय हवामान खात्याने यावेळी म्हटले आहे.