लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील सावरखेड गावाजवळील दुर्गम जंगलात एकाचा खड्ड्यात पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोन जण जखमी झाले आहेत. चार जण एका वाहनातून येथे आले होते. संशय आल्यावर त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थ गेल्यावर धावपळीत खाली पडून एकाचा मृत्यू झाला. रहेमत खान हमीद खान (रा.कारंजा, जि.वाशीम) असे मृतकाचे नाव आहे. अंद्धश्रद्धा व जादुटोण्यातून पैशांचा कथित पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणारा हा प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पातूर तालुक्यात सावरखेड हे अतिशय दुर्गम भागात गाव आहे. या भागात विरळ लोकवस्ती आहे. गावालगतच्या जंगलात फारसा कुणाचा वावर नसतो. मध्यरात्रीच्या सुमारास काही जण चारचाकी वाहनातून त्या जंगलात गेले होते. अचानक कुणी तरी चारचाकी वाहनातून आल्याने ग्रामस्थांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. ते अंधश्रद्धा व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा कथित पाऊस पाडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी काही विधी देखील केला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यासोबतच काही गावकऱ्यांना ते गोवंश चोरीसाठी आल्याचा संशय आला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर संशयितांनी वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत खड्ड्यात पडून रहेमत खान हमीद खान (रा.कारंजा, जि.वाशीम) यांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सखोल तपास सुरू केला. ते संशयित घेऊन आलेल्या चारचाकी वाहनाचे चाक देखील जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात पातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेवरून जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू होती.

पातूर पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड गावाजवळील दुर्गम जंगलात काही जण चारचाकी वाहन घेऊन आले होते. अंद्धश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा ग्रामस्थांना संशय आला होता. त्यामुळे धावपळीतून एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. -हनुमंत डोपेवाड, पोलीस निरीक्षक, पातूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain of money through superstition and witchcraft in patur forest ppd 88 mrj