नागपूर : राज्याच्या काही भागात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाळ्यात एवढा पाऊस पडूनही वातावरणातील उकाडा कायम आहे. त्यातच “ऑक्टोबर हिट” ने भर घातली आहे. राज्याच्या काही भागातून मोसमी पावसाच्या परतीची वाटचाल सुरू झाली आहे. काही ठिकाणी मात्र ती व्हायची आहे. दरम्यान, उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा अशा चक्रव्यूहात नागरिक अडकले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने शनिवार आणि रविवार पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर शहरात आज पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला. तर सायंकाळी दीक्षाभूमीवर देखील कार्यक्रम असून त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक पोहचले आहेत. हवामान खात्याचा अंदाज आणि एकूण स्थिती पाहता दिक्षाभूमीवरील कार्यक्रमावर देखील पावसाचे सावट आहे.
हे ही वाचा… ‘या’ गावचे दैवत आहे रावण… दसऱ्याच्या दिवशी दहन नव्हे पूजा; ग्रामस्थ म्हणतात…
परतीचा पाऊस उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. मात्र, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर १२ ते १६ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा १८ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. नागपूर शहरात अधूनमधून पावसाची हजेरी सुरू आहे. तर पुणे शहरात देखील काल, शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असे संमिश्र वातावरण आहे राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे ‘ऑक्टोबर हीट’ चटके जाणवत आहे.
हे ही वाचा… RSS Centenary Years : विजयादशमीचा सोहळा, पण… संघ स्वयंसेवकांच्या कवायती झाल्याच नाहीत, कारण…
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक हवामान झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पालघर , ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या शहरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.