गोंदिया: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबणीवर गेला. त्यामुळे पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. दरम्यान, आर्द्रा नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्याची पावसाची सरासरी भरून निघाली. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची पेरणी केली तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी रोवणीलाही सुरुवात केली. मात्र, गेल्या सात दिवसांपासून जिल्ह्यातून पावसाने माघार घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे उकाळ्यात वाढ झाली असून गोंदियाकर चांगलेच हैराण झाले आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२९.३ मिमी पाऊस होत असते. दरम्यान, जून महिन्यात १ ते ३० जून या कालावधीत १९२.८ पावसाची नोंद करण्यात येते. यंदा जून महिन्यातील पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यातच आर्द्रा नक्षत्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २२ जून रोजी पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यात २८ जून पर्यंत पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यानंतर मात्र, जिल्ह्यात तुरळक पावसाची नोंद होऊ लागली. असे असले तरी ३० जून पर्यंत सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मात्र, प्रत्यक्षात २९ जूनपासून पाऊस जिल्ह्यातून पसार झाल्याचे चित्र असून जुलै महिन्यात दमदार पावसाची ऐंट्री झालेली नाही. त्यामुळे १ ते ५ जुलै दरम्यान, सरासरी ५३.५ मिमी पावसाची नोंद होत असताना यंदा केवळ १.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्याची टक्केवारी २.१ आहे.
हेही वाचा >>>अकोला : रुळावरून चालतांना कानात हेडफोन अन् मागून धडधड मालगाडी आली…पुढे..
तर १ जून ते ५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २४६.३ मिमी सरासरी पाऊस पडत असताना आतापर्यंत २१६.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत जून महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला असला तरी जुलै महिन्याची सुरुवात निराशाजनक झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुबार पेरणीचे संकट तर ओढावणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.जिल्ह्यात गेल्या १ जून ते ५ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी पाहता जिल्ह्यातील संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात २१६.८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने आशेचे किरण शेतकऱ्यांना दिसणार अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा >>>पंधरा दिवसातच सिनेअभिनेत्री रविना टंडन दुसऱ्यांदा ताडोबात; दुपारपर्यंत तब्बल अकरा वाघांचे दर्शन
अनेक शेतकऱ्यांनी धान नर्सरी पेरणी केली आहे. तर ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असेल. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी धीर ठेवावे.-हिंदूराव चव्हाण, कृषी अधीक्षक अधिकारी, गोंदिया