नागपूर : पावसाने पुन्हा एकदा राज्याचा बराचसा भाग व्यापला आहे. ऑगस्टच्या पूर्वार्धात दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्याच्या बहुतांश भागांवर ढगांची चादर पसरलेली असून विदर्भासह, मराठवाडा आणि कोकण पट्ट्यातील दक्षिणेकडे पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाने परतीची वाट धरली असाच अनेकांचा समज झाला होता. मात्र, पाऊस परतल्यामुळे अनेकांचीच त्रेधातिरपीट उडत आहे. राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज बुधवारी राज्यात सर्वदूर विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा – Nagpur orange : नागपूरच्या प्रसिद्ध संत्रीला बागेतच गळती

सध्या कुठे मध्येच लख्ख प्रकाश तर कुठे याच उन्हामध्ये पावसाच्या सरींची बरसात होत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान येत्या २४ तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूच्या उत्तर भागापासून आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती पाहता सध्या राज्यावरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे येत्या २४ तासांमध्ये राज्यातील रत्नागिरी, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगर आणि नवी मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला होता.

हेही वाचा – लाडकी बहीण योजना : खात्यावर जमा केले ३ हजार अन् मिळताहेत केवळ पाचशे ते १ हजार रुपये! बँकांकडून कात्री…

मुंबईसह उपनगरात मंगळवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडले होते. आज मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाच्या सरी बरसतील. गोवा आणि कोंकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २४ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी बरसणार आहेत. ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात २४ ऑगस्टपर्यंत पाऊस राहील, त्यामुळे या दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस असेल.