एकीकडे दिवसभर वरुणराजाची हजेरी तर दुसरीकडे एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन.. अशा वातावरणात ढोल ताशांच्या निनादात आणि गुलालांची उधळण करीत नागपूरसह विदर्भातील विविध भागातील सार्वजनिक मंडळात आणि घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळपासून पावसांची संततधार सुरू असताना गणरायाची मूर्ती घडणाविऱ्या चितारओळीत गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. असा जयघोष करीत चितारओळीतून मूर्ती नेल्या जात होत्या. चितारओळीमध्ये विविध मूर्तीकारांकडे गेल्या तीन महिन्यांपासून मूर्ती घडविण्याचे काम सुरू होते. त्यावर अखेरचा हात फिरविला जात असताना पावसाने हजेरी लावल्याने अनेक मूर्तीकारांची चांगलीच पंचाईत झाली. पावसाने विश्रांती घेताच गणेशभक्तांची चितारओळीत गर्दी वाढत होती. दिवसभर पाऊस सुरू असला तरी गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता. या पावसामुळे अनेक सार्वजनिक गणेश मंडळाची तारांबळ उडाली.
आबालवृद्ध गणपतीचा जयजयकार करीत मूर्तीवर प्लास्टीक टाकूनमूर्ती घेऊन जात होते. अनेक मंडळात एक दिवस आधीच गणरायाचे आगमन झाले. आज सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. एचबी टाऊनमध्ये विदर्भाचा राजा, तुळशीबाग परिसरात नागपूरचा राजा तर पाताळेश्वर मार्गावर महालाच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या राजवाडय़ातील व जुनी मंगळवारी भागातील गांडल्याच्या गणपतीचे भर पावसात वाजत गाजत पालखीत आगमन झाल्यानंतर त्यांच्याकडे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी केल्यानंतर ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत कोणी कारमध्ये तर कोणी दुचाकीवर नेत होते. गणपती मूर्तीसोबत मूषक, जानवे, गोफ, आदी पूजेचे साहित्य खरेदी केले जात होते. भावसार चौकाकडून चितारओळीकडे येणारा मार्ग वाहनांसाठी बंद केल्यामुळे गांधी पुतळा ते अग्रेसन चौक या मार्गावर गणपती नेण्यासाठी आणलेली वाहने ठेवण्यात आली होती. बडकस चौक आणि भावसार चौकात अनेक मोठी वाहने उभी केल्यामुळे सकाळी ११ नंतर या भागातील वाहतूक खोळंबली होती. सकाळी काही वेळ पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी ३ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर गणेश भक्ताची चितारओळसह शहरातील विविध भागात गर्दी वाढू लागली. शहरातील बहुतेक सार्वजानिक गणेश मंडळाचे गणपती दुपारनंतर नेण्यात आले. चितारओळ परिसरात दुपारनंतर गणेशभक्ताची अक्षरश यात्रा भरल्याचे दिसून आले.
गणपतीच्या आगमनाला कुठलीही अनुचित घडू नये म्हणून चितार ओळीसह शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पाऊस सुरू असल्यामुळे गणपतीची मूर्ती खराब होऊ नये याची काळजी घेत अनेक जण मूर्तीवर प्लास्टीक गुंडाळून घेऊन जात होते. चितारओळ परिसरात प्लास्टीक कापड विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा