लोकसत्ता टीम
गोंदिया: गोंदिया शहरासह जिल्ह्यात शनिवारची पहाट विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस घेऊन आली. सुसाट वारा सुटला असता सकाळी ७:३० ते ८ वाजेच्या सुमारास सर्वत्र काळोख पसरला होता. यामुळे लोकांची तारांबळ उडाली.
आज सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे . देवरी, सालेकसा तालुक्यांत शेत शिवारात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यात ही काही भागातही पावसाने हजेरी लावली.
आणखी वाचा- नागपूर: जरीपटक्यात महिला- पुरूषामध्ये ‘फ्री स्टाईल’ वादाचे कारण काय?
या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच इतर पिकांचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. गत दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. आज जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने विविध भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यात गहू, हरभरा, उडीद पिकांचा समावेश आहे.