अकोला : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून रिमझिम पाऊस पडला. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वातावरणातील बदलामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले.

अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये सकाळी ७.३० वाजतापासून रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाऊस सुरूच होता. काही भागात पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे अनेक भागात रस्त्यावर पावसाचे पाणी देखील साचले आहे.

हेही वाचा >>>अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. रेनकोट व छत्री घेऊन नागरिक घराबाहेर पडले. गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण असतांना त्यातच आज अवकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस, तूर, गहू, ज्वारी, हरभरा आदींसह विविध रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांवर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याचे दिवस अनुभवता येत आहेत. जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ झाली. पावसाला पोषक वातावरण तयार झाले. हवामान विभागाने आणखी एक-दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, कृषी उत्पन्न बाजार समितीतही शेतमाल विक्रीला आणला असल्यास काळजी घ्यावी, वीज व गारांपासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, विजा चमकताना झाडाखाली थांबू नये, मोबाईल बंद ठेवावा आदी सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’

वाशीम जिल्ह्यातही अवकाळी पाऊस 

वाशीम जिल्ह्यात सुद्धा शुक्रवारी सकाळपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळपासून अवकाळी पाऊस पडायला लागला. वातावरणात बदल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीसह रब्बी पिके, फळबागा आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. अकोला, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट पुन्हा एकदा ओढवले. शेतकऱ्यांनी उत्पादित मालाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Story img Loader