शहरात पावसाच्या हलक्या सरी
पावसाळा सरल्यावर हिवाळ्याची चाहूल लागण्याआधी ‘ऑक्टोबर हीट’च्या तडाख्यातून जावे लागते. ‘ऑक्टोबर हीट’च्या परतीचा प्रवास सुरू असतानाच अखेरच्या आठवडय़ात त्यावर ढगांनी चादर पांघरली आहे. त्यामुळे मध्येच थंडगार वाऱ्याची झुळूक, तर मध्येच उष्ण वाऱ्याच्या लहरी, अशा विचित्र हवामानाला आणि परिणामी आरोग्याच्या समस्यांना नागरिक सामोरे जात असतानाच गुरुवारी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
विजयादशमीच्या एक-दोन दिवस आधीपासूनच नागपूरसह महाराष्ट्रातील, विशेषत: विदर्भातील काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण होते. विजयादशमीला नागपूरच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. देशातील काही भागात कोसळणारा पाऊस आणि कमी दाबाचा पट्टा याचा हा परिणाम होता. दरम्यान, अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे, पण त्या तुलनेत थंडी मात्र फारशी नाही. मात्र, आज कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात बराच गारवा पसरला. ‘ऑक्टोबर हीट’ मध्ये सुद्धा ते तापमान असायला हवे त्यापेक्षा तीन ते चार अंशाने तापमान अधिक होते. विदर्भातील काही शहरांनी ३५ अंशाचा टप्पा ओलांडून ३७ अंशाचा टप्पा गाठला होता. साधारणपणे पावसाळा सरल्यावर असे होते, पण यंदा तापमान तुलनेने अधिक आहे. सध्या विदर्भातील अनेक शहरांमध्ये ढगांनी पांघरलेल्या चादरीमुळे ‘ऑक्टोबर हीट’ आटोक्यात आली आणि रात्रीचे तापमानही कमी झालेले आहे. मध्यप्रदेशात झालेला पाऊस आणि गारपिटीच्या एक दिवस आधीपासूनच आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली, पण पावसाचे कोणतेही संकेत नसताना गुरुवारी दुपारी कोसळलेल्या पावसाने नागपूरकर अचंबित झाले.
अरेबियन समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, मध्यप्रदेशातील गारपिटीसह छत्तीसगड, उत्तरप्रदेशात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्याचा थोडाफार परिणाम रात्रीच्या तापमानावर झाला असला तरीही हे तापमान अजूनही जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये रात्रीचे तापमान २० अंशाखाली असते. यंदा मात्र ते २० अंशापेक्षा अधिक आहे. या ढगाळ वातावरणामुळे पावसाची थोडीफार संधी होती, पण आता पावसाची शक्यताच नाही. या एकूणच वातावरणामुळे मध्येच थंडगार वाऱ्याची झुळूक येत असली तरीही आजुबाजूच्या वातावरणात मात्र उष्मा आहे. गेल्या तीन ते चार दशकात ऑक्टोबरमध्ये गारपीट झाल्याचे हवामानाच्या अहवालात कुठेही नमूद नाही. मात्र, २०११, २०१२ पासून सातत्याने गारपीट सुरू असल्याने राज्यातील काही शहरांवर पांघरली गेलेली ढगांची चादरसुद्धा निघून जाईल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
हिवाळ्याच्या सुरुवातीला अशा वातावरणाचा अनुभव येतो. मात्र, यावर्षी थंडीची सुरुवातही उशिरा होईल. डिसेंबर, जानेवारीत मात्र थंडीचा तडाखा अनुभवायला मिळेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
कळमेश्वर तालुक्यात गारपीट
कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारी गारांसह पाऊस झाला. याचा तालुक्यातील झुनकी, चिंधी, वरोडा, पार्डी, गोवरी, खैरी, सावळी, वाठोडा, सुसुंद्री, कोहळी, उबाळी या गावांसह मोहपा परिसराला जोरदार तडाखा बसला. तालुक्यात दुपारी अर्धातास वादळासह पाऊस झाला आणि आवळ्याएवढय़ा गारा पडल्या. यामुळे संत्राबागांचे व कापसाचे मोठे नुकसान झाले. उपजिल्हाधिकारी डॉ. अर्चना पठारे व तहसीलदार जी. के. पुरके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ऐन दिवाळीच्या तोंडावर गारपीटमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.